कला-क्रीडा नैपुण्याचे गुण मिळवणाऱ्यांची संख्यावाढ

पुणे : राज्यभरातील १ लाख ८८ हजार १३१ विद्यार्थ्यांना कला आणि क्रीडा नैपुण्यासाठी अतिरिक्त गुण मिळवण्याची कला साधली आहे. त्यात केवळ चित्रकलेसाठी १ लाख ४४ हजार १८३ विद्यार्थ्यांनी अतिरिक्त गुण मिळवले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत अतिरिक्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

शास्त्रीय गायन, नृत्य, चित्रकला, लोककला, वादन, नाटय़कला आदी विविध कलांमध्ये जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत ३ ते  २५ च्या दरम्यान अतिरिक्त गुण दिले जातात.

गेल्यावर्षी १ लाख ३६ हजार ९७९ विद्यार्थ्यांना या गुणांचा लाभ देण्यात आला होता. तर यंदा १ लाख ८८ हजार १३१ विद्यार्थ्यांना वाढीव गुणांचा लाभ मिळाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अतिरिक्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ५१ हजारांनी वाढली आहे. त्याचवेळी नाटय़, एनसीसी आणि स्काऊट गाईड या प्रकारात अतिरिक्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. लोककला या प्रकारात गेल्यावर्षी ४ हजार ८७४ विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळाले होते, तर यंदा १० हजार ६७६ विद्यार्थ्यांनी गुण मिळवले आहेत.

निकालाची टक्केवारी अशी..

राज्यातील २८ शाळांचा निकाल शून्य ते दहा टक्के  लागला आहे. तर ८ हजार ३६० शाळांचा शंभर टक्के  निकाल लागला आहे. शून्य ते दहा टक्के  निकाल लागलेल्या शाळांमध्ये लातूर विभागातील सर्वाधिक ९, मुंबई, अमरावती विभागातील प्रत्येकी तीन शाळांचा समावेश आहे. तर शंभर टक्के  निकाल लागलेल्या शाळांमध्ये मुंबई विभागातील सर्वाधिक १ हजार ७१४ शाळा आहेत. त्यानंतर पुणे विभागातील १ हजार ६९३, कोल्हापूर विभागातील १ हजार २५५ शाळा आहेत.