२८ फेब्रुवारी हा विज्ञान दिन. या दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तसेच पुण्यातील विविध संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर विज्ञानाशी निगडीत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा विद्यापीठाच्या वार्षिक कार्यक्रमा अंतर्गत एरोमोडेलिंग शो आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा आनंद लोकांना वर्च्युअल स्वरूपात घेण्यात येणार आहे. याचे आयोजन सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन अँड कम्युनिकेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

भौतिकशास्त्राचे भारतीय वैज्ञानिक सी. व्ही. रामन यांनी केलेल्या रमण इफेक्ट शोधाच्या निमित्ताने दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी विज्ञान दिन साजरा केला जातो.

यावर्षी विद्यापीठाच्या सायन्स पार्कमध्ये आठवडाभर निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, ज्यात अतिथी तज्ञांचे व्याख्यान, विज्ञानाशी संबंधित कथा आणि कविता, वैज्ञानिक मॉडेलचे प्रदर्शन, चित्रकला आणि इतर विविध स्पर्धांचा समावेश आहे.

कार्यक्रमांची रूपरेषा

सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन अँण्ड कम्युनिकेशनचे प्राध्यापक डी.जी. कान्हेरे म्हणाले की, यावर्षी हे कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात होणार आहेत आणि याची सुरूवात २४ फेब्रुवारी रोजी डॉ. सुधा राजामनी यांच्या ‘ॲस्ट्रोबायोलॉजी’ या विषयावरील व्याख्यानाद्वारे झाली. तर २५ फेब्रुवारी रोजी एम.एफ. मक्की यांचे खनिजांचे छंद या विषयावर व्याख्यान झाले.

आज, २६ फेब्रुवारी रोजी हेमंत माने ‘एक्सप्लोरिंग कॅलेंडर’ या विषयावर आणि त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी डॉ.ज्योत्स्ना पडळकर यांच्या ‘टीन्स कार’ विषयावर भाषणं होतील. सर्व चर्चा संध्याकाळी ४ वाजता होणार आहेत आणि सायन्स पार्क यांच्या यूट्यूबवर चॅनेलवर प्रसारित होणार आहेत.

२८ फेब्रुवारीला विद्यापीठाच्या आवारात एरोमोडेलिंग शो आयोजित केला जाईल. याशिवाय विद्यापीठाने मुलांसाठी आयोजित केलेल्या कविता, चित्रकला, कथा लेखन अशा विविध स्पर्धांचे निकाल त्याच दिवशी जाहीर केले जातील. त्याच दिवशी विज्ञान विभागाचा आभासी दौरादेखील आयोजित केला जाईल. एक विशेष कार्यक्रम म्हणजे ‘कलर्स थ्रू केमिस्ट्री’ हा नवा कार्यक्रम आणि विभागाच्या नवीन वेबसाइटचे उद्घाटन २८ फेब्रुवारी रोजी केले जाईल.