विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत ‘डार्विन’बाबत ‘मार्मिक’ प्रश्न

केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी डार्विनच्या उत्क्रांती सिध्दांतच चुकीचा असल्याचे वक्तव्य करून देशभर वाद निर्माण केला. त्याला विरोध करण्यासाठी शास्त्रज्ञ, संशोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे तार्किक आकलन किती हे पाहण्यासाठी पुण्याच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चच्या  परीक्षेत, ‘सत्यपाल सिंह यांच्या वक्तव्यात काय चुकीचे आहे, हे स्पष्ट करा’, असा ‘मार्मिक’ प्रश्न विचारला. विज्ञानविषयक जागृती विद्यार्थ्यांमध्ये  किती आहे हे तपासणारा हा प्रश्न आहे. ‘या विधानावर चर्चा सुरू करत नाही तर व्यवहार्य दृष्टिकोनातून विद्यार्थी कसे उत्तर देतील, हे तपासतो, असे संस्थेचे अधिष्ठाता संजीव गलांडे यांनी सांगितले.

शिक्षण देताना किंवा प्रश्नपत्रिकांमध्ये आमचा भर हा ठोकळेबाज पद्धतीने शिकवण्यापेक्षा ते समजून घेता यावा, यावर भर असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीला चालना मिळून, त्यांनी व्यवहार्य उत्तर द्यावे ही अपेक्षा असते. विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा कस लागावा या हेतूने असे प्रश्न घातले जातात, असे गलांडे यांनी सांगितले. ‘या प्रश्नाचा उद्देश विद्यार्थ्यांना तार्किक भूमिकेतून विचार करता यावा याच हेतूने हा प्रश्न विचारला आहे’, असे गलांडे यांनी स्पष्ट केले. सत्यपाल सिंह यांनी गेल्या महिन्यांत मानवाच्या उत्क्रांतीबाबत डार्विनचा सिद्धांत वैज्ञानिक दृष्टय़ा चुकीचा असल्याचे सांगत, तो अभ्यासक्रमाचा भागही असता कामा नये असे वक्तव्य केले होते.