|| प्रथमेश गोडबोले

कोथरूड परिसरात स्प्रिंग फिल्ड को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी आहे. सोसायटी अंतर्गत सांस्कृतिक आणि व्यवस्थापकीय अशा दोन समित्या कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून सोसायटीमध्ये दहिहंडी, दिवाळी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव असे पारंपरिक सण, उत्सव आणि १५ ऑगस्ट, २६ जानेवारी असे राष्ट्रीय दिवस मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. हे उपक्रम साजरे करताना सोसायटीने सामाजिक भानही जपले आहे. विशेष म्हणजे सोसायटीमध्ये केवळ महिलांची व्यवस्थापन समिती २००९ ते २०१२ या कालावधीत कार्यरत होती. सोसायटीमध्ये विविध क्षेत्रांतील नामवंत मंडळी राहण्यास असल्याने विचारांची देवाणघेवाण सातत्याने होत असते. अनेक वर्षे एकत्र राहत असल्याने सर्वाचे एकमेकांशी कौटुंबिक नाते तयार झाले आहे.

कोथरूड परिसरात चार इमारती आणि दोनशे सदनिकांची स्प्रिंग फिल्ड सोसायटी आहे. सोसायटी अंतर्गत सांस्कृतिक आणि व्यवस्थापकीय अशा दोन समित्या कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून सोसायटीमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येतात. उन्हाळी सुट्टीत विशेष उपक्रम करण्यात येतात. तसेच फनफेअरही आयोजित केले जाते. त्यात विविध खेळ आयोजित करण्यात येतात. हे खेळ लहान मुलांबरोबरच मोठय़ांसाठीही आयोजित केले जातात. त्यामध्ये धावणे, चित्रकला स्पर्धा यांसह अनेक स्पर्धाचा समावेश असतो. एका वर्षी सोसायटीमधील कलाकारांनी एकत्र येऊन तीन तासांचा वाद्यवृंदाचा-गीतांचा कार्यक्रम सादर केला होता.

गणेशोत्सवात आणि जोडून येणाऱ्या सुट्टय़ांमध्ये विविध विषयांवरील मान्यवरांची व्याख्याने सोसायटीतर्फे आयोजित केली जातात. सोसायटीमध्ये पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशाचे आगमन ढोल-ताशांच्या गजरात होते. यावेळी लेझीमचा खेळ असतो. सोसायटीमधील महिला आणि ज्येष्ठ महिला देखील लेझीम मोठय़ा उत्साहाने खेळतात. गणेशासमोर सोसायटीमधील ज्येष्ठ महिलांकडून भजन सादर केले जाते. अथर्वशीर्ष म्हटले जाते.

सोसायटीचा स्वत:चा जलतरण तलाव आणि क्लब हाऊस आहे. जलतरण तलाव गेल्या वीस वर्षांपासून उत्तमरीत्या कार्यरत आहे. तर, क्लब हाऊसमध्ये सोसायटीमधील महिलांचा योगा दररोज सकाळी होतो. महिला सक्षमीकरणाचा भाग म्हणून सोसायटीत २००९ ते २०१२ या कालावधीत संपूर्ण महिलांची व्यवस्थापन समिती कार्यरत होती.

सोसायटीने सामाजिक भानही जपले आहे. सोसायटीमधील सुनंदन लेले यांच्या पुढाकाराने ‘सायकल-रिसायकल’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. स्प्रिंगफिल्ड सोसायटीच्या सभासदांनी सुरुवातीला पन्नास सायकल गोळा केल्या. सभासदांमार्फत काही निधीही गोळा करण्यात आला. या सायकल दुरूस्त करून ग्रामीण भागातील गरजू मुलांना देण्यास सुरुवात करण्यात आली. हा उपक्रम ‘सायकल-रिसायकल’ नावाने राबवला जातो.

या उपक्रमाबरोबरच सोसायटीमधून रद्दी संकलित केली जाते. ती विकून आलेले पैसे मेळघाटात काम करणाऱ्या मैत्री संस्थेला दिले जातात. तसेच अनाथाश्रमाला धान्य आणि कपडेही दिले जातात. होळी सणाला होळीत नैवेद्य म्हणून अन्न न टाकता, तेच अन्न एकत्र करून दरवर्षी पदपथावरील गरजू नागरिकांना दिले जाते. सोसायटीमधून ई-वेस्ट गोळा करून तेही संस्थांना दान केले जाते.

सोसायटीच्या सभासदांनी सोसायटीच्या आवारात भरपूर झाडे लावली आहेत. त्यामध्ये तुळस, गवती चहा आदी देशी झाडांचाही समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्कही आहे. सोसायटीच्या चारही दिशांना छोटय़ा-छोटय़ा बागा तयार करण्यात आल्या आहेत. सोसायटीला स्वत:चे मैदान आहे. सोसायटीमधील ओला कचरा सोसायटीमध्येच जिरवला जातो. त्यामुळे केवळ सुका कचरा महापालिकेकडून उचलला जातो. सोसायटीने पर्जन्य पुनर्भरण व्यवस्था केली असून ते पाणी सोसायटीच्या विंधन विहिरीत सोडले जाते. स्वयंपाकघरात वापरले जाणारे पाणी शुद्ध करून ते सोसायटीमधील बागांना वापरले जाते.

राष्ट्रीय सण असलेल्या १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला सोसायटीमध्ये झेंडावंदन होते. सोसायटीमधील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना झेंडावंदनाचा मान दिला जातो. झेंडावंदन झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांकडून सामूहिक प्रतिज्ञा म्हटली जाते. याच दिवशी सोसायटीमधील सर्व सभासदांना वार्षिक अल्पोपाहार दिला जातो. सोसायटीमध्ये महिलांची वेगळी दहिहंडी साजरी होते. तर, नवरात्रात दांडियाही आयोजित केला जातो. दिवाळीत किल्लाही तयार केला जातो. तुळशीच्या लग्नात सोसायटीमध्ये दिव्यांची रोषणाई केली जाते. वट पौर्णिमेला वडाच्या झाडाच्या फांद्या तोडण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. त्यामुळे सोसायटीमधील सभासदांनी छोटय़ा कुंडीत वडाचे झाड लावले असून त्या झाडाचीच वट पौर्णिमेला महिलांकडून पूजा केली जाते. सोसायटीतर्फे महिलांच्या सहली देखील आयोजित करण्यात येतात. त्यामध्ये लहान मुलांपासून ८० वर्षांच्या आजींपर्यंत सर्व सहभागी होतात. सोसायटीचे अध्यक्ष म्हणून विनय जोगळेकर काम पाहतात. तर, उपाध्यक्ष म्हणून दीपक कामत आणि सुरेश पाटील काम पाहतात. सोसायटीच्या सांस्कृतिक समितीचे काम हेमंत शिरगुप्पी, आनंद कानगो आणि अन्य सभासद पाहतात.

prathamesh.godbole@expressindia.com