News Flash

अशीही ‘हेरगिरी’!

‘हेरगिरी’ करण्यासाठी वापरली जाणारी ‘स्पाय गॅजेटस्’ अर्थात छुपे कॅमेरे बसवलेल्या उपकरणांना सामान्य नागरिकांकडूनही मागणी वाढते अाहे.

| December 21, 2013 03:00 am

प्रियकर-प्रेयसी, नवरा-बायको, ऑफिसमध्ये कर्मचारी-बॉस अशा जवळच्या व्यक्तींचा एकमेकांवर संशय असेल किंवा दुसरी व्यक्ती आपली फसवणूक करत असल्याचा संशय असेल.. तर अशा शंका दूर करण्यासाठी पूर्वी अनेकजण गुप्तहेरांची मदत घ्यायचे. पण आता असे गुप्तहेर नेमण्याऐवजी किंवा इतर कोणाची मदत घेण्याऐवजी सामान्य नागरिकच गुप्तहेर बनू लागले आहेत.. याचा पुरावा म्हणजे ‘हेरगिरी’ करण्यासाठी वापरली जाणारी ‘स्पाय गॅजेटस्’ अर्थात छुपे कॅमेरे बसवलेल्या उपकरणांना सामान्य नागरिकांकडूनही वाढलेली मागणी! पुण्यातील ‘स्पाय कॅमेऱ्यां’च्या विक्रीचा आलेख पाहता गेल्या दोन वर्षांत शहरात या विक्रीमध्ये तब्बल दीडपट वाढ झाल्याचे निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवले आहे.
छुपे कॅमेरे बाजारात दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. काही सोबत नेता येतील असे (पोर्टेबल) आणि काही एखाद्या ठिकाणी लावून ठेवता येतील असे (फिक्स्ड) हे दोन प्रकार आहेत. यापैकी पोर्टेबल कॅमेरा लहान असल्यामुळे त्याची बॅटरी लहान असते. त्यामुळे त्यात कमी कालावधीचे म्हणजे सुमारे दीड ते चार तास छायाचित्रण होऊ शकते. त्या तुलनेत फिक्स्ड कॅमेऱ्यात बॅटरीच्या क्षमतेनुसार अधिक कालावधीसाठी (७ ते ८ तास) छायाचित्रण करता येते. अनेकांना फक्त छुपा कॅमेरा बसवलेले पेन माहिती असते. पण आता शर्टाचे बटण, हातावर बांधण्याचे घडय़ाळ, की-चेन, चष्मा, हँडबॅग अशा निरनिराळ्या कल्पक स्वरूपांत हे छुपे कॅमेरे सहजी उपलब्ध होतात. याव्यतिरिक्त टेबलावर ठेवण्याचे घडय़ाळ, फोटो फ्रेम, विजेचे सॉकेट, कॅल्क्युलेटर, पाण्याची बाटली अशा रूपांतही ते उपलब्ध आहेत. या कॅमेऱ्यांच्या किमती अडीच ते तीन हजारांपासून सुरू होत असल्यामुळे ते सामान्यांच्या खिशालाही परवडणारे ठरत आहेत.
‘सिक्युरिटी प्लॅनेट’ या दुकानाचे मालक सत्फुल सोनावणे म्हणाले, ‘‘छुपा कॅमेरा बसवलेले हातातले घडय़ाळ, शर्टाचे बटण, स्त्रियांमध्ये हँडबॅगमध्ये बसवलेला छोटा कॅमेरा घडय़ाळात बसवलेला छुपा कॅमेरा यांना मागणी आहे. नवरा-बायको किंवा प्रियकर-प्रेयसी एकमेकांवर नजर ठेवण्यासाठी स्पाय कॅमेऱ्यांची खरेदी करत असल्याचेही दिसून येते. जोडीदारावर असलेला संशय दूर करण्यासाठी गुप्तहेरांची मदत घेण्यापेक्षा मंडळी ही उपकरणे वापरून स्वत:च माहिती काढत आहेत. कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये एखादा कर्मचारी कार्यालयाची गोपनीय माहिती बाहेरील व्यक्तीला देत असल्याचा संशय असेल तरी ही उपकरणे वापरली जात आहेत.’’
अनेकदा ग्राहक आपल्या घरातील वस्तूंमध्ये छुपा कॅमेरा बसवून घेत असल्याचे निरीक्षण ‘इझेडसीसीटीव्ही इंडिया प्रा. लि.’चे व्यवस्थापक सुभाष पाटील यांनी नोंदवले. ते म्हणाले, ‘‘फ्लॉवरपॉट, बाहुली अशा वस्तूंमध्ये छुपा कॅमेरा बसवता येतो. पेन, घडय़ाळ, की-चेन आणि यूएसबी (पेन ड्राईव्ह) यात बसवलेल्या छुप्या कॅमेऱ्यांना मागणी आहे. कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणारे लोक छुपे कॅमेरे घेण्यात आघाडीवर आहेत. कार्यालयातील एखाद्या अतिमहत्त्वाच्या बैठकीचा पुरावा राहावा म्हणून छायाचित्रण करण्यासाठी हे कॅमेरे वापरले जातात. कामाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती महिला कर्मचाऱ्याबरोबर असभ्य वर्तन करत असेल तर अशा गोष्टीचा पुरावा मिळवून त्या व्यक्तीस समोर आणता यावे म्हणूनही या कॅमेऱ्यांचा उपयोग महिलांकडून केला जातो. या कॅमेऱ्यांची विक्री ऑनलाईनही होत असल्यामुळे विक्रीत वाढ झालेली दिसून येते.’’
लांब वायरच्या तोंडावर बसवलेल्या ‘स्नेक कॅमेऱ्या’साठीही काही ग्राहक विचारणा करत असल्याचे पाटील म्हणाले. मोठय़ा इमारतींच्या छताला लावलेल्या झुंबरांमधून हा कॅमेरा खाली सोडून छायाचित्रण करता येते.

छुप्या कॅमेऱ्यांचा वापर ही अतिशय जबाबदारीने करायवयाची बाब आहे. याबाबत पोलीस अधिकारी व माध्यम क्षेत्रातील तज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत..

‘मुली-महिलांनी विशेष काळजी घ्यावी’
‘‘छुप्या कॅमेऱ्यांच्या संभाव्य गैरवापरापासून स्वत:चा बचाव करणे गरजेचे आहे. नातेसंबंधांमध्ये छुप्या कॅमेऱ्यांचा वापर करून महिलांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार घडणे शक्य आहे. त्यामुळे मुली व महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आपला प्रत्येक निर्णय जागरुकपणे घेणे तसेच मैत्री किंवा व्यवसायविषयक ओळखी वाढवण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीची आगाऊ माहिती काढणे गरजेचे आहे.’’
– संजय शिंदे, पोलिस उपायुक्त (सायबर शाखा)

‘वापराबाबत जनजागृती हवी’
‘‘गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सुरक्षेच्या कारणास्तव वापरल्या जाणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उलाढाल पुण्यात पाच पटीने वाढली आहे. पण ‘स्पाय गॅजेटस्’ प्रामुख्याने स्टिंग ऑपरेशनच्याच उद्देशाने वापरले जात असल्याने त्याचे मार्केट विखुरलेले आणि उलाढाल तुलनेने खूप कमी आहे. छुपे कॅमेरे प्रामुख्याने चीनमधून आयात केले जात असून, ते चुकीच्या कारणासाठी वापरले जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे त्यांच्या वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे.’’
– रत्नेश राठी, अध्यक्ष, काँप्युटर्स अँड मीडिया डीलर्स असोसिएशन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2013 3:00 am

Web Title: spy camera and spy gazetts
Next Stories
1 मुठा कालव्यातील गळती; पर्यायी बोगदा बांधण्याची योजना
2 ‘एसएनडीटी’ च्या कन्या सायकलवरून गाठणार कन्याकुमारी
3 लष्करी जाचाला कंटाळलेल्या ग्रामस्थांचे दापोडीत आंदोलन