पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पुढील वर्षांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्याच्या निर्णयाच्या पाश्र्वभूमीवर विभागीय शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांनी शाळांच्या मुख्याध्यापकांची सोमवारी बैठक घेतली. विद्यार्थी आणि पालकांची ३० जानेवारीपर्यंत बैठक घेऊन त्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्याच्या सूचना या वेळी मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पुढील वर्षांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर शहरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया कशी असेल याबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थी आणि पालकांची ३० जानेवारीपर्यंत बैठक घेऊन त्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती देण्यात यावी अशा सूचना मुख्याध्यापकांना या वेळी देण्यात आल्या आहेत.
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती करण्यात येणार आहे. दहावीची परीक्षा झाल्यानंतर आठवडाभरात विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचे माहिती पुस्तक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे कंत्राट कोणाला द्यावे याबाबत अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, येत्या काही दिवसांमध्ये त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले.
याबाबत शिंदे म्हणाल्या, ‘‘ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या अर्जामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत फार फरक पडणार नाही. मात्र, विद्यार्थ्यांना पालकांना आधीपासून या प्रक्रियेची माहिती असावी म्हणून मख्याध्यापकांना बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे विनाअनुदानित आणि अनुदानित महाविद्यालयांमधील फरक, प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे लागतात याबाबतही या बैठकीमध्ये सूचना देण्याबाबत मुख्याध्यापकांना सांगण्यात आले आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळेल.’’