राज्यभरात दहावीची लेखी परीक्षा सोमवारपासून सुरू होत असून या वर्षी जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमाचे मिळून १७ लाख २८ हजार ३६८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. प्रवेशपत्रातील चुकांमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांला परीक्षा देण्यासाठी अडचण येणार नाही, अशी हमी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी दिली आहे.
  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ९ विभागीय मंडळांतर्फे घेण्यात येणारी माध्यमिक प्रमाणपत्र लेखी परीक्षा (इयत्ता १० वी) ३ मार्चपासून सुरू होत आहे. दहावीच्या परीक्षेसाठी या वर्षी पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार १५ लाख ५८ हजार ६३९ विद्यार्थ्यांनी, तर जुन्या अभ्यासक्रमानुसार १ लाख ६९ हजार ७२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात ९ लाख ६७ हजार ७२९ विद्यार्थी तर ७ लाख ६० हजार ६५४ विद्यार्थिनी आहेत. या वर्षी १२ हजार ९८२ अपंग विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. राज्यात ४८०२ केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी मंडळाने राबवलेल्या गैरमार्गाशी लढा अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्य़ासाठी ७ या प्रमाणे २४५ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय मंडळ स्तरावर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांला कोणत्याही कारणास्तव नियोजित परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाल्यास, त्याला जवळच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देता येणार आहे.
परीक्षेची वैशिष्टय़े

  • – जुन्या अभ्यासक्रमाची परीक्षा देणाऱ्यांसाठी शेवटची संधी
  • – गणित आणि विज्ञानाची नव्या अभ्यासक्रमानुसार शंभर गुणांची परीक्षा
  • – खेळाडूंसाठी २५ गुणांची सवलत फक्त उत्तीर्ण होण्यापुरतीच

विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विभागीय मंडळनिहाय हेल्पलाइन
पुणे- (०२०)६५२९२३१६, ६५२९२३१७
नागपूर- (०७१२)२५६०२०९, २५५३३६०, २५५३४०१
औरंगाबाद- (०२४०)२३३४२२८, २३३४२८४
मुंबई- (०२२) २७८८१०७५, २७८९३७५६
नाशिक- (०२५३) २५९२१४३
कोल्हापूर- (०२३१) २६९६१०१, २६९६१०२,०३
अमरावती- (०७२१)२६६२६०८, २६६२६७८
लातूर- (०२३८२) २५८५७०, २५८२४१
कोकण- (०२३५२) २२८४८०