दहावीच्या भूगोलाच्या आणि इतिहासाच्या पुस्तकामध्ये झालेल्या चुका सुधारून त्या ‘शिक्षण संक्रमण’च्या माध्यमातून आणि सुधारित मजकुराच्या स्टीकर्सच्या माध्यमातून शाळांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने वेळोवेळी दिले खरे, मात्र अजूनही या विषयांच्या नव्या अभ्यासमंडळांची नेमणूकच न झाल्यामुळे पुस्तकांमधील सुधारित मजकूर राज्यातील १६ लाख विद्यार्थापर्यंत पोहोचलेला नाही.
भूगोलाच्या दहावीच्या पुस्तकात भारताच्या नकाशातून अरुणाचल प्रदेश वगळल्याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर भूगोलाचे अभ्यासमंडळ बरखास्त करण्यात आले होते. या पुस्तकाबाबत सभागृहामध्ये प्रश्न विचारण्यात आल्यानंतर आणि पुस्तकातील चुकांबाबत सातत्याने होणाऱ्या टीकेनंतर पुस्तकातील चुका सुधारण्यात येतील आणि सुधारित पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली जातील असे मंडळाकडून सांगण्यात येत होते. त्यानंतर या सर्व पुस्तकांमध्ये या चुकीच्या नकाशावर स्टिकर चिकटवण्यात आले. त्यासाठी सुमारे १५ लाख रुपये खर्च आला. मात्र, आता या स्टिकरमधील कच्छची आंतरराष्ट्रीय सीमा चुकीची दर्शवण्यात आल्याचे समोर आले होते.  मात्र या चुका सुधारण्यासाठी अजूनपर्यंत या विषयाचे नवे अभ्यास मंडळ नेमण्यात आलेले नाही. त्यामुळे शाळा सुरू होऊन तीन महिने झाले, तरी या पुस्तकामध्ये असलेल्या नकाशांच्या जवळपास चुकांची सुधारणा अजूनही झालेली नाही.
मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार पुस्तकामधील चुका किंवा पुस्तकाबाबत आलेल्या सूचना अभ्यास मंडळासमोर ठेवल्या जातात. त्यावर चर्चा होऊन, ठराव होऊन पुस्तकामध्ये बदल केले जातात. मात्र, सध्या अभ्यासमंडळच अस्तित्वात नसल्यामुळे तयार करण्यात आलेले स्टिकर्स कुणी तयार केले आणि त्यानंतर निदर्शनास आलेल्या चुका कधी सुधारण्यात येणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. भूगोलाच्या पुस्तकातील चुकांची दखल घेऊन सव्‍‌र्हे ऑफ इंडियाने या पत्राद्वारे याबाबत प्रकाशकांविरुद्ध गुन्हा दाखल करावा आणि पुस्तकांमध्ये सुधारित नकाशे देण्यात यावेत, अशा सूचना केल्या होत्या. याबाबत निवृत्त शिक्षक नरेंद्र तांबोळी यांनी सव्‍‌र्हे ऑफ इंडियाकडे तक्रार दिली होती आणि या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता.
‘‘भूगोलाचे अभ्यास मंडळ नेमण्याचे काम सुरू आहे. येत्या दहा दिवसांमध्ये अभ्यास मंडळाची नियुक्ती होईल. त्यांच्यासमोर पुस्तकाबाबतच्या सूचना मांडण्यात येतील. त्यानंतर शिक्षण संक्रमणच्या माध्यमातून शाळांना सुधारित भागाची माहिती दिली जाईल. पुढील वर्षी बाजारात येणाऱ्या पुस्तकांमध्ये या चुकांची सुधारणा केली जाईल. प्रकाशित करण्यात आलेल्या सर्वच पुस्तकांचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे.’’
– गंगाधर मम्हाणे (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ)