बालपणीच्या एका अपघातामुळे गमवावे लागलेले दोन्ही हात.. संकट हीच संधी मानून त्याने पायाशीच दोन हात करीत दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन सर केलेला यशाचा कळस… प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या साहिलच्या पायामध्ये चांदीचा तोडा परिधान करून करण्यात आलेला सत्कार.. या सत्कारापेक्षाही पायात लेखणी धरून कागदावर देखणी अक्षरे उमटविणाऱ्या साहिलला पाहताना शाळकरी मुलांना मिळालेली प्रेरणा.. गणेशोत्सवाच्या माध्यमातून विधायक काम करणाऱ्या साईनाथ मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हृद्य कार्यक्रम घडवून आणला.
शाळेतील स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाची घरामध्ये रंगीत तालीम करीत असताना झालेल्या अपघातामध्ये दोन्ही हात गमवावे लागलेल्या वडगाव शेरी येथील साहिल शेख या मुलाचा दहावी उत्तीर्ण झाल्याबद्दल चांदीचा तोडा आणि फेटा परिधान करून सत्कार करण्यात आला. राजा धनराज गिरजी शाळेत झालेल्या या कार्यक्रमातून उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना यशाचे शिखर गाठण्याची प्रेरणा मिळाली. सामाजिक कार्यकर्त्यां रेणू गावस्कर, शाळेचे मुख्याध्यापक अशोक सोनवणे, चांदीचा तोडा भेट देणाऱ्या पु. ना. गाडगीळ अॅन्ड सन्सचे व्यवस्थापक किरण जावळकर, शंकरराव भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, साहिलचे आजोबा अजीज शेख, शाहीर हेमंत मावळे, मंडळाचे अध्यक्ष पियुष शहा या वेळी उपस्थित होते.
पायामध्ये लेखणी धरीत साहिल याने कागदावर देखणी अक्षरे उमटविण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. या पराक्रमाकडे उत्सुकतेने पाहणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची लेखन करणाऱ्या साहिलचे छायाचित्र काढण्यासाठी लगबग सुरू होती. छत्रपती शिवरायांची वेशभूषा केलेल्या कलाकाराने साहिलला चांदीचा तोडा परिधान केला. प्रतिकूलतेवर मात करीत यशोशिखर गाठणाऱ्या हेलेन केलर यांची जीवनगाथा सांगत रेणू गावस्कर यांनी मुलांशी अनोखा संवाद साधला. पीयूष शहा यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट केली.