दहावीला पुनर्मूल्यांकनामध्ये गुण वाढलेल्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या चौथ्या प्रवेशफेरीमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना घडली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे गुण वाढले आहेत आणि त्यांना महाविद्यालय बदलायचे आहे, अशा विद्यार्थ्यांनी मंगळवार आणि बुधवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात संपर्क साधावा, असे विभागीय शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांनी सांगितले आहे.
दहावीला पुनर्मूल्यांकनात गुण वाढलेल्या विद्यार्थ्यांना कट ऑफ नुसार प्रवेश मिळणे शक्य असतानाही प्रवेश नाकारल्याची घटना घडली आहे. प्रवेश प्रक्रियेमध्ये एकदाच बेटरमेंटची संधी मिळत असल्यामुळे गुण वाढूनही विद्यार्थ्यांना बेटरमेंट मिळालेली नाही. त्याचप्रमाणे चौथ्या प्रवेशफेरीमध्ये अनेक महाविद्यालयांमध्ये कट ऑफ पेक्षा अधिक गुण असूनही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे प्रकार घडत आहेत. प्रक्रियेबाबत पुरेशी माहिती नसलेले पालक, प्रवेशाचा घोडेबाजार करणाऱ्या संस्था आणि हतबल प्राचार्य अशा गोंधळात अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची चौथी फेरी सापडल्याचे दिसत आहे.  
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये प्राधान्य दिलेल्या महाविद्यालयांपैकी एखाद्या महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर पुढील एकाच फेरीसाठी बेटरमेंटची संधी उपलब्ध होती. मात्र, त्यामध्येही हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे या विद्यार्थिनीने ऑफलाइन पद्धतीने सुरू असणाऱ्या चौथ्या फेरीसाठी एका महाविद्यालयात अर्ज भरला. दरम्यानच्या कालावधीत या विद्यार्थिनीला पुनर्मूल्यांकनाचे गुण मिळाले. त्यामध्ये तिचे गुण वाढले होते. मात्र, कट ऑफ गुणांपेक्षा जास्त गुण असूनही या विद्यार्थिनीला प्रवेश नाकारण्यात आला. काही महाविद्यालयांकडून कागदपत्रांचे कारण देत प्रवेश नाकारण्यात येत आहेत. प्रवेशाच्या या गोंधळात पालकांची मात्र फरफट सुरू आहे.
पुनर्मूल्यांकनात गुण वाढलेल्या विद्यार्थ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन
दहावीला पुनर्मूल्यांकनात गुण वाढलेल्या विद्यार्थ्यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात मंगळवार आणि बुधवारी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी येताना प्रवेश अर्ज, जुने आणि बदललेले गुणपत्रक, शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत घेऊन यावी, असे शिंदे यांना सांगितले.