बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही यंदा मुलींनीचं बाजी मारलीये. दहावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८३.४८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णांमध्ये मुलींचे प्रमाण ८४.२० टक्के आणि मुलांचे प्रमाण ८२.२४ इतके आहे. 
बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही यंदा नव्यानेच सुरू झालेल्या कोकण विभागातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली. या विभागातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागातील उत्तीर्णांचे प्रमाण ९३.७९ टक्के इतके आहे. काही वर्षांपूर्वी लातूर पॅटर्न म्हणून प्रसिद्ध झालेल्या लातूर विभागाचा निकाल यंदा सर्वांत कमी म्हणजे ७३.७५ टक्के इतका आहे.
विभागवार निकाल टक्क्यांमध्ये पुढीलप्रमाणे
मुंबई – ८८.९२
पुणे – ८८.२५
नागपूर – ७३.९९
औरंगाबाद – ८१.१८
लातूर – ७३.७५
नाशिक – ८३.८६
अमरावती – ७४.६०
कोल्हापूर – ९०.३६
एकूण ८१ शाळांचा निकाल शून्य ट्केक इतका लागला असून, १०० टक्के निकाल असलेल्या शाळांची संख्या २७०९ इतकी आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्चमध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. मंडळाच्या संकेतस्थळावर शुक्रवारी दुपारी १ नंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येतील. शाळांमध्ये १५ जूनला गुणपत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे. गुणपत्रक मिळाल्यानंतर २५ जूनपर्यंत गुणपडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे.