टोलफोड आंदोलनानंतर टोलसंबंधीची पुढील भूमिका जाहीर करण्यासाठी ९ फेब्रुवारी रोजी पुण्यात सभा घेण्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले असले, तरी या सभेच्या जागेचा प्रश्न तूर्त तरी सुटलेला नाही. मनसेने प्राधान्य दिलेल्या स. प. महाविद्यालयाने सभेसाठी मैदान द्यायला नकार दिला आहे. त्यामुळे आता एसएसपीएमएसच्या मैदानासाठी प्रयत्न सुरू आहेत.
टोलविरोधातील आंदोलन सुरू झाल्यानंतर राज ठाकरे गेल्या आठवडय़ात तीन दिवस पुण्यात होते. मात्र, टोलबाबत पुण्यात येऊन ९ फेब्रुवारीला पुढील भूमिका जाहीर करीन, असे त्यांनी त्या वेळी सांगितले होते. त्यामुळे या सभेबाबत चर्चा सुरू झाली असली, तरी सभेचे ठिकाण अद्यापही निश्चित झालेले नाही. या सभेसाठी नदीपात्रातील सर्कस मैदान मिळावे अशी मनसेची इच्छा होती. राज यांची महाराष्ट्र दौऱ्यातील सभाही याच ठिकाणी झाली होती. मात्र, या जागेवर सध्या मनोरंजन नगरी उभारलेली असल्यामुळे स. प. महाविद्यालयाकडे जागेबाबत विचारणा करण्यात आली. स. प. महाविद्यालयाचे मैदान द्यायला नकार देण्यात आल्यामुळे एसएसपीएमएसचे मैदान मिळण्यासाठी मनसेतर्फे मंगळवारी संस्थेला पत्र देण्यात आले आहे.
टिळक चौकातही सभेचे आयोजन करण्यासाठी मनसे उत्सुक आहे. मात्र तेथे पोलिसांकडून परवानगी दिली जाणार नसल्यामुळे कोणत्या तरी शाळा-महाविद्यालयाच्या वा संस्थेच्या मैदानावरच या सभेचे आयोजन करावे लागणार आहे. ‘सभेच्या जागेबाबत बुधवारी (५ फेब्रुवारी) निर्णय होईल,’ असे नगरसेवक बाबू वागसकर यांनी सांगितले. सभा रविवारी (९ फेब्रुवारी) सायंकाळी सहा वाजता होणार आहे.