राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) इंटरनेट आरक्षण प्रणालीद्वारे तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशाला प्रवासासाठी या तिकिटाबाबत आलेला ‘एसएमएस’ही ग्राह्य़ धरला जाणार आहे. ही सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे, असे एसटीच्या वतीने कळविण्यात आले.
प्रवाशांना चांगली सुविधा देण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक माध्यमांचा एसटीकडून वापर सुरू करण्यात आला आहे. ग्राहकांच्या सूचना लक्षात घेऊन त्यात वेळोवेळ बदलही करण्यात येत असतात. एसटीचे तिकीट ऑनलाईन यंत्रणेतून काढल्यानंतर प्रवासाच्या वेळी संबंधित ई- तिकिटाची प्रत जवळ बाळगणे किंवा हे तिकीट लॅपटॉप, मोबाईलवर वाहकास दाखविणे बंधनकारक होते.
प्रवाशांनी केलेल्या सूचनांची दखल घेऊन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी प्रवाशांना त्यांच्या ई-तिकिटाबाबतचा एसएमएस मोबाईलवर पाठविण्याबरोबरच प्रवासात हा एसएमएस ग्राह्य़ धरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची तांत्रिक कार्यवाही अंतिम टप्प्यात असून, लवकरच ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.