जिल्हा प्रशासनाच्या अहवालात बाब स्पष्ट

पिंपरी चिंचवडमधील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी भोसरी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महेश लांडगे, तर जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील दहा मतदारसंघांपैकी पुरंदरमधील शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे यांनी निवडणुकीत सर्वाधिक खर्च केला. जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात दहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये पुरंदरमधील शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे यांनी सर्वाधिक २७ लाख ४३ हजार रुपये खर्च केला. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे संजय जगताप यांनी २३ लाख ७५ हजार रुपये खर्च केला. ग्रामीण भागात तुलनेने सर्वात कमी खर्च आंबेगाव मतदारसंघात झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील यांनी १६ लाख २५ हजार ९१५ रुपये, तर भाजपचे उमेदवार राजाराम बाणखेले यांनी नऊ लाख १६ हजार रुपये खर्च केला.

जिल्ह्य़ातील इतर मतदारसंघांपैकी जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे अतुल बेनके यांनी २० लाख १५ हजार ४८५ रुपये, शिवसेनेचे शरद सोनवणे यांनी १२ लाख ६३ हजार ९९८ रुपये, तर अपक्ष उमेदवार आशा बुचके यांनी १६ लाख २९ हजार ५८१ रुपये खर्च केला. खेड आळंदीमध्ये राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते यांनी २२ लाख ६९ हजार रुपये, शिवसेनेचे सुरेश गोरे यांनी १६ लाख ७७ हजार रुपये आणि अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांनी १८ लाख ५२ हजार रुपये खर्च केला.

शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे अशोक पवार यांनी १६ लाख ४८ हजार रुपये, भाजपचे बाबुराव पाचर्णे यांनी १२ लाख ४१ हजार रुपये, तर मनसेच्या कैलास नरके यांनी केवळ दोन लाख १७ रुपये खर्च केला. दौंडमध्ये राष्ट्रवादीचे रमेश थोरात यांनी २२ लाख ५२ हजार, भाजपचे राहुल कुल यांनी २३ लाख ३४ हजार रुपये खर्च असून इंदापुरात राष्ट्रवादीचे दत्ता भरणे यांनी २५ लाख ४० हजार, भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांनी २३ लाख २१ हजार रुपये खर्च केला.

भोरमध्ये काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांनी २३ लाख ६९ हजार, तर शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांनी २१ लाख २८ हजार खर्च केला, तर मावळात राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांनी २० लाख २४ हजार, तर भाजपचे बाळा भेगडे यांनी नऊ लाख ८३ हजार रुपये खर्च केला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये भोसरीत सर्वाधिक खर्च

पिंपरी चिंचवडमधील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी भोसरी मतदारसंघात सर्वाधिक खर्च करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी १६ लाख ६४ हजार, भाजपचे लक्ष्मण जगताप यांनी १६ लाख ६९ हजार, पिंपरीमध्ये राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यंनी १६ लाख ६४ हजार, तर शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांनी १५ लाख ८० हजार आणि भोसरीमध्ये अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी १८ लाख ७४ हजार, तर भाजपचे महेश लांडगे यांनी २५ लाख ३७ हजार रुपये खर्च केला.