क्रेडाई महाराष्ट्रची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे : गेल्या वर्षभरात करोनामुळे बांधकाम क्षेत्राला फटका बसला आहे. यातून बांधकाम क्षेत्र सावरत असतानाच पुन्हा करोनाची दुसरी लाट आली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने बांधकाम क्षेत्रासाठी आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कात चालू आर्थिक वर्षातही (३१ मार्च २०२२ पर्यंत) सवलत द्यावी, अशी मागणी क्रे डाई महाराष्ट्रचे अध्यक्ष सुनील फु रडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे के ली आहे. तसेच राज्यात सध्या लागू असलेल्या निर्बंधांमधून बांधकाम क्षेत्राशी संलग्न सेवांना करोना प्रतिबंधक नियम पाळत ५० टक्के  क्षमतेने काम करण्याची परवानगी देण्याची विनंतीही पत्रात करण्यात आली आहे. करोनामुळे बांधकाम क्षेत्राला पुन्हा उभारी देण्यासाठी राज्य सरकारने नवीन घर खरेदीवर मुद्रांक शुल्कात कपात केली होती. या सवलतीचा फायदा करून घेत ही सूट चालू वर्षी ३१ मार्च रोजी संपली.

या पार्श्वभूमीवर क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष फुरडे म्हणाले, ‘करोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम बांधकाम क्षेत्रावर अल्पावधीतच दिसू शकतो. म्हणूनच या परिस्थितीतून तग धरण्यासाठी सरकारने ३१ मार्च २०२२ पर्यंत मुद्रांक शुल्कात सवलत द्यावी. त्यामुळे गृहविक्री व नोंदणी यांमध्ये वाढ होऊन सरकारी मिळकतीवरही याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. तसेच सनदी लेखापालांप्रमाणेच वास्तुविशारद, स्थापत्य विषयक अभियंते यांची कार्यालये करोनाविषयक नियमांचे पालन करून ५० टक्के  क्षमतेने सुरू करण्याची परवानगी सरकारने द्यावी. सिमेंट, स्टील, हार्डवेअर यांचा पुरवठा करणाऱ्या दुकानांना किमान चार ते पाच तास सुरू ठेवण्याची मुभा द्यावी.’

दरम्यान, काही लहान शहरांमध्ये स्थानिक बांधकाम मजूर हे बांधकामाच्या ठिकाणी न राहता आपापल्या घरीच किं वा आसपासच्या परिसरात राहत असतात. हे लक्षात घेता या मजुरांच्या येण्या-जाण्यावर निर्बंध नसावेत. काम पुरवण्यात आले नाही, तर हे परराज्यातील मजूर आपापल्या राज्यात पुन्हा परतण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेऊन संबंधित विभागाला तशा सूचना दिल्या जाव्यात, असेही फुरडे यांनी सांगितले.