23 November 2019

News Flash

पुण्यात ६८ लाखांचा स्टॅम्प पेपर घोटाळा उघड, एकाच कुटुंबातील तिघांना अटक

राज्यात २००३ साली उघडकीस आलेल्या तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याने देशभरात एकच खळबळ माजली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशीच एक घटना पुण्यात उघडकीस आली आहे.

पुणे : नुकत्याच उघडकीस आलेल्या स्टँप पेपर घोटाळ्यातील संबंधीत दुकान.

राज्यात २००३ साली उघडकीस आलेल्या तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याने देशभरात एकच खळबळ माजली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशीच एक घटना पुण्यात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील लाल महाल समोरील इमारतीमध्ये एका दुकानात कोषागार अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट शिक्का तयार करुन तो स्टँप पेपरवर उमटवून त्याचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, चिन्मय सुहास देशपांडे (वय २६), सुहास मोरेश्वर देशपांडे (वय ५९) आणि सुचेता सुहास देशपांडे (वय ५४, सर्व रा. पारसनीसवाडा, कसबा पेठ) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कोषागार अधिकारी प्रथम मुद्रांक लिपीक कोषागार पुणे करीता असा बनावट शिक्का या आरोपींनी बनवून घेतला होता. हा शिक्का ते १०० आणि ५०० रुपयांच्या स्टॅप्म पेपरवर उमटवून त्याचा गैरवापर करीत होते. अटक करण्यात आलेल्या एकाच कुटुंबातील या तिघा आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

झोन १चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल महालासमोरील कमला कोर्ट इमारतीमध्ये देशपांडे व्हेंडर या दुकानात बनावट शिक्का तयार करुन तो १०० आणि ५०० रुपयांच्या स्टॅप्म पेपरवर उमटवून त्याचा गैरवापर केला जात असल्याची माहिती आम्हाला खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार देशपांडे व्हेंडरच्या कार्यालयाची झडती घेतली असता येथे ६८ लाख ३८ हजार १७० रुपयांचे बनावट शिक्के मारलेले स्टॅम्प पेपर आढळले.

एवढ्या प्रमाणात स्टँप पेपरमधील घोटाळा समोर आल्याने यात आणखी काही जण सहभागी असण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोपींकडे चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस उपायुक्त बावचे यांनी सांगितले.

First Published on June 20, 2019 3:00 pm

Web Title: stamp paper scam disclosure of rs 68 lakhs in pune three arrested from a family aau 85
Just Now!
X