शहरात मीटरद्वारे घरगुती तसेच व्यावसायिक ठिकाणी जो पाणीपुरवठा केला जातो, त्या पाणीपट्टीच्या दरात वाढ करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने मंगळवारी एकमताने फेटाळला. प्रशासनाने मीटरद्वारे केल्या जाणाऱ्या पाणीपट्टीच्या दरात टप्पेनिहाय १० ते १५ टक्के वाढ सुचवली होती.
स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी त्यांचे अंदाजपत्रक सादर करताना मीटरद्वारे केल्या जाणाऱ्या पाणीपट्टीच्या दरात वाढ प्रस्तावित केली होती. त्यामुळे १५ ते २० कोटी रुपयांचे वाढीव उत्पन्न मिळेल, असा अंदाज होता. आयुक्तांनी मिळकत करासह अन्य कोणत्याही करात तसेच पाणीपट्टीतही वाढ प्रस्तावित केली नव्हती. फक्त मीटरच्या पाणीपट्टीत वाढीचा प्रस्ताव होता. तो मंगळवारी फेटाळण्यात आला.
शहरात २२ हजार ६९८ घरगुती, ४६१ अमृततुल्य आणि १४ हजार ७७९ व्यावसायिक नळजोडांना मीटरद्वारे पाणी दिले जाते. या सर्वाना या दरवाढीचा फटका बसणार होता. विजेचे दर तसेच देखभाल-दुरुस्तीवरील खर्चात सातत्याने होत असलेली वाढ यामुळे ही दरवाढ करण्याचा प्रस्ताव होता. दरवाढ मंजूर करण्याऐवजी पाणीपट्टीची जी कोटय़वधी रुपयांची थकबाकी आहे ती वसूल करण्यावर प्रशासनाने भर द्यावा, अशी सूचना करण्यात आली आहे. शहरातील पाणीपट्टीची एकूण थकबाकी २१० कोटी इतकी आहे.

खडकवासला ते पर्वती नवी वाहिनी
खडकवासला ते पर्वती दरम्यान एक नवी जलवाहिनी टाकण्याच्या कामाला ठेकेदाराने घेतलेली स्थगिती उच्च न्यायालयाने मंगळवारी उठवली. या प्रक्रियेला आव्हान देणारी याचिकाही न्यायालयाने फेटाळली आहे. खडकवासला धरणातून महापालिका जे पाणी कालव्यातून घेते, त्याऐवजी संपूर्ण पाणी आता जलवाहिनीद्वारे आणू शकेल. ठेकेदाराने या कामाला न्यायालयात आव्हान दिल्यामुळे काम रखडले होते. ते आता मार्गी लागेल.