सणस मैदानासमोरील क्रीडांगणाची जागा गरवारे बालभवन या संस्थेला भाडे तत्त्वावर पुढील पाच वर्षांसाठी देण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने सोमवारी एकमताने घेतला. महापालिका आणि बालभवन यांचा हा संयुक्त प्रकल्प असेल.
गरवारे बालभवन या उपक्रमासाठी संबंधित ओम चॅरिटेबल ट्रस्टला १९८५ साली ही जागा भाडे तत्त्वावर देण्यात आली होती. वेळोवेळी झालेल्या करारानुसार संस्थेला जागा वापरण्यास देण्यात येत होती. कराराची मुदत २००९ मध्ये संपल्यानंतर महापालिकेने तयार केलेल्या जागावाटप नियमावलीनुसार पुढील मुदतीसाठी ट्रस्टला जागा द्यावी, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या जागेसाठी महापालिका प्रशासनाने जाहीर निविदा प्रक्रिया राबवली. निविदा प्रक्रियेत प्रथम फक्त ओम ट्रस्टचीच निविदा आली. त्यानंतर निविदा सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती.
महापालिका प्रशासनाने या जागेसाठी मासिक ४४ हजार ३८८ रुपये अशी रक्कम निर्धारित केली होती. ओम चॅरिटी ट्रस्टने मासिक ६० हजार रुपये इतकी रक्कम देऊ केली आहे. त्यामुळे बालभवन ही इमारत, तसेच सुमारे पाच हजार चौरसफूट एवढी मोकळी जागा ट्रस्टला पुढील पाच वर्षांसाठी संयुक्त प्रकल्प तत्त्वावर भाडे कराराने देण्यास मंजुरी मागणारा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. तो मंजूर करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या निर्णयानुसार महापालिकेबरोबर ट्रस्टला तसा करार करावा लागेल व संयुक्त प्रकल्प म्हणून बालभवनतर्फे हा उपक्रम चालवला जाईल.