News Flash

‘स्टार’ कासव आणि पैशाचा पाऊस!

पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पोलीस कर्मचारी नितीन रावळ यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत एक माहिती मिळाली होती.

‘स्टार’ कासव आणि पैशाचा पाऊस!
तस्कराला अटक करून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेली स्टार प्रकारातील कासवे.

अंधश्रद्धेतून कासव तस्करी करणाऱ्याला पकडले

आजच्या आधुनिक युगातही अनेकजण अंधश्रद्धेच्या गाळात रुतलेले असल्याचे वास्तव पुण्यात स्टार प्रकारातील कासवाच्या तस्कराच्या माध्यमातून समोर आले आहे. पैशाचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेतून कासवाची ही तस्करी होत असल्याची गंभीर बाबही या निमित्ताने समोर आली आहे. अंगावर चांदणीसारखे रेखाटण असलेली दोन कासवे पोलिसांनी आरोपीकडून ताब्यात घेतली असून, ती कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाकडे सोपविण्यात आली आहेत.

पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पोलीस कर्मचारी नितीन रावळ यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत एक माहिती मिळाली होती. त्यानुसार खिलारेवाडी एरंडवणा येथे राहणारा प्रशांत सुदाम सातपुते (वय २९) याने स्टार जातीचे कासव विक्रीसाठी आणले असून, ते त्याने घरात ठेवल्याचा तपशील पोलिसांना मिळाला. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कासव या प्राण्याचा सर्वोच्च ‘अ’ गटात समावेश आहे. कासवाच्या विविध जाती नामशेष होत असल्याने त्याच्या जतनाबाबत कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. पोलिसांनी या माहितीतील गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने याबाबत वनविभागालाही माहिती दिली.

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक पवार, वनपरिमंडळ अधिकारी गणेश सरोदे यांच्यासह पोलिसांनी खिलारेवाडी येथील सातपुते याच्या घरी तपासणी केली. त्याच्या घरामध्ये स्टार जातीची दोन कासवे मिळाली. त्यामुळे सातपुतेला ताब्यात घेण्यात आले. कासवांना प्राणी संग्रहालयाकडे सोपविण्यात आले. स्टार जातीच्या या कासवांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अमूल्य असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ही कासवे आरोपीने तस्करीसाठी आणली होती. अशा प्रकारचे कासव बाळगल्यानंतर पैशांचा पाऊस होतो, हे या तस्करीमागचे कारण असल्याची प्राथमिक माहितीही तपासातून समोर आली आहे.

वनखात्याने दिलेल्या फिर्यादीनुसार सातपुतेवर गुन्हा दाखल करून न्यायालयाच्या आदेशानुसार २५ जानेवारीपर्यंत त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. संबंधित गुन्ह्यमध्ये सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. त्याने कासव कोठून आणले, ते कुणाला विकणार होता, त्याचे इतर साथीदार आहेत का? आदींबाबत आता पोलीस तपास करीत आहेत. पोलीस निरीक्षक दीपक निकम, सहायक निरीक्षक संदीप देशमाने, उपनिरीक्षक संजय गायकवाड, अजय म्हेत्रे, कर्मचारी किशोर शिंदे, मच्छिंद्र वाळके आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

कासव आणि गांडूळ जवळ बाळगल्यास पैशाचा पाऊस पडतो, या अंधश्रद्धेवर कोणीही विश्वास ठेवू नये. कासव, घुबड, मोर, देशी किंवा गावठी पोपट, हरीण, मांडूळ हे प्राणी जवळ बाळगण्यास बंदी आहे. त्यामुळे ते जवळ न बाळगण्याबरोबरच या प्राण्याची खरेदी, विक्रीही कुणी करू नये. कोणाजवळ अशा प्रकारचे प्राणी आढळल्यास त्याबाबत वनविभाग किंवा जवळील पोलिसांना त्याबाबतची माहिती द्यावी, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2019 1:27 am

Web Title: star turtle and rain of money
Next Stories
1 शिवाजीराव आढळराव यांच्यापुढे यंदा मोठे आव्हान!
2 ‘अनुकूल’ अभिप्रायासाठी धडपड
3 दुष्काळग्रस्तांना रोजगार देण्याची तयारी
Just Now!
X