पुणे रेल्वे स्टेशन परिसरात चक्की विक्री करणारे प्रविण वानखेडे आणि त्यांची पत्नी हे दाम्पत्य अंध आहे. सध्या लॉकडाउनच्या काळात सर्वसाधारण व्यक्तीला अनेक अडचणींना समोरे जावे लागत असताना या दाम्पत्याला तर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काल वानखेडे यांच्या घरातील गॅस सिलेंडर संपल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. रोजगार बुडाल्याने आर्थिक चणचण आणि ते राहत असलेला भाग सील केल्यामुळे त्यांना सिलेंडर घेणंही शक्य होत नव्हतं. त्यांची ही अडचण वानवडी पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः या दाम्पत्याला सिलेंडर आणून दिला आणि सुरक्षेसाठी घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला.

पोलिसांच्या या मदतीसाठी प्रविण वानखेडे यांनी त्यांचे आभार मानले तसेच आपल्यासारख्यांच्या अडचणीही शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्या सारख्या अनेकांच्या हाताला सध्या काम नाही, त्यामुळे त्यांची अवस्था बिकट बनली आहे. याची दखल घेऊन शासनानं पुढील काही दिवसांसाठी आम्हाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पोलिसांच्या मदतीबाबत सांगताना प्रविण आणि कल्पना वानखेडे म्हणाले, आम्ही दोघं पती-पत्नी रामटेकडी भागात अनेक वर्षांपासून राहत आहोत. दोघेही अंध असल्याने, आम्हाला इतरांसारख काम करता येत नाही. त्यामुळे मी पुणे स्टेशन परिसरात चक्की विकण्याचे काम करतो. त्यातून मला दररोज साधारण ३०० रुपये मिळतात. मात्र, मागील दोन महिन्यांपासून करोनामुळं मला बाहेर जाता आलेलं नाही. त्यामुळं घरात जेवढे काही साहित्य होतं त्यावर आम्ही गुजरान करीत आहोत. पण काल आमच्या घरातील सिलेंडरही संपला, आमचा भाग सील केल्यानं सिलेंडर मिळणं मुश्किल होत. त्यामुळं पत्नीनं चुलीवर स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्या हाताला चटके बसले. त्यानंतर हा धोका आणि उपासमार टाळण्यासाठी आम्ही धानोरी येथील नातेवाइकांकडे जाण्याचा निर्णय घेतला. पण यासाठी पोलिसांची परवानगी पाहिजे होती. त्यासाठी आम्ही दोघे नाकाबंदीच्या ठिकाणी जाऊन आमची समस्या पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी आमची अडचण लक्षात घेता सिलेंडर आणून दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

यावर वानवडी पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर म्हणाल्या, मी काल नाकाबंदीच्या ठिकाणी असताना प्रविण आणि कल्पना हे दोघे अंध पती-पत्नी घराबाहेर पडण्यासाठी परवानगी मागण्यासाठी आले होते. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांच्या घरातील सिलेंडर संपला असून पत्नीला चुलीवर काम करता येत नसल्याने त्यांना दुसऱ्याठिकाणी नातेवाईकांकडे जायचे असल्याचे कळले. तेव्हा त्यांना मी म्हटलं तुम्ही जाऊ नका, आम्ही व्यवस्था करून देतो. मात्र, तरीही ते ऐकण्याच्या तयारीत नव्हते. मात्र, दोघांची समजूत काढल्यांतर ते तयार झाले. त्यानंतर हवालदार ज्ञानेश्वर शेलार आणि स्थानिक पोलीस मित्रांच्या मदतीने त्यांना आम्ही घरपोच सिलेंडर पोहोचवला.