खोटी गुणपत्रिका सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याबाबत राज्य शिक्षण मंडळाने केलेल्या सूचनांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याबद्दल पुण्यातील स.प. महाविद्यालयाची मान्यताच मंडळाने काढून घेतली. या महाविद्यालयाच्या बारावी परीक्षांचे अर्ज स्वीकारणे मंडळाने बंद केल्याने महाविद्यालयाच्या कारभारामुळे बारावीची परीक्षा देणाऱ्या आठशे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स.प. महाविद्यालयाने केलेल्या अनियमिततेमुळे बोर्डाने महाविद्यालयाचा ‘इंडेक्स नंबर’ रद्द केला आहे, म्हणजेच महाविद्यालयाची मान्यता काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे या महाविद्यालयाचा बोर्डाशी कोणत्याही प्रकारे संबंध राहणार नाही, महाविद्यालयाशी पत्रव्यवहार होणार नाही, अशी माहिती पुणे विभागाच्या सचिव पुष्पलता पवार यांनी दिली. याचा परिणाम या वर्षी बारावीला शिकणाऱ्या आठशे मुलांवर होणार आहे. बोर्डाने स.प. महाविद्यालयाचे परीक्षांचे अर्ज स्वीकारणे बंद केले आहे.
असे काय घडले?
फेब्रुवारी २०१३ मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल ३० मे रोजी जाहीर झाला. त्या वेळी स.प. महाविद्यालयातील एका विद्यार्थ्यांला ७१ टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर ६ जूनला महाविद्यालयात गुणपत्रके वाटण्यात आली. त्या वेळी या विद्यार्थ्यांला मिळालेल्या गुणपत्रकामध्ये ९५ टक्के गुण असल्याचे दिसत होते. या पाश्र्वभूमीवर मंडळाने या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक मागवले. ते गुणपत्रक खोटे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांची सर्व माहिती पाठवण्याची आणि या विद्यार्थ्यांला दाखला न देण्याची सूचना बोर्डाने महाविद्यालयाला केली.
हा विद्यार्थी न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयातही गुणपत्रक खोटे असल्याचे सिद्ध झाले. महाविद्यालयाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, अशी सूचना मंडळाने महाविद्यालयाला दिली. मात्र, तब्बल वीस वेळा पत्र पाठवूनही महाविद्यालयाने पोलिसांकडे तक्रार दिली नाही किंवा पत्रांना उत्तरेही दिली नाहीत. मंडळाने महाविद्यालयाला दोनदा ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावली. मात्र, त्यावरही महाविद्यालयाने काही केले नाही. या पाश्र्वभूमीवर मंडळाने महाविद्यालयाला २१ नोव्हेंबर रोजी अंतिम इशारा दिला. ‘४८ तासांमध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, त्याचप्रमाणे आजपर्यंतच्या पत्रांना उत्तरे का पाठवली नाहीत याचे स्पष्टीकरण देण्यात यावे, अन्यथा महाविद्यालयाची मान्यता काढून घेण्यात येईल,’ असा हा इशारा होता. त्यावरही हालचाल न झाल्याने महाविद्यालयाची मान्यता काढून घेतली असल्याचे पत्र मंडळाने पाठवले.

‘महाविद्यालयाला अनेक वेळा इशारा, सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने मंडळाला कारवाई करणे भाग पडले. संबंधित विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, ही भूमिका असली, तरी खोटे गुणपत्रक तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांला पाठीशी घालण्यात येऊ नये असा निर्णय मंडळाच्या तदर्थ मंडळाच्या बैठकीत झाला. त्यानुसार या विद्यार्थ्यांला पाच परीक्षांसाठी बंदी घालण्यात आली आणि महाविद्यालयामध्ये गुणपत्रकांचे वाटप झाले असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या विरुद्ध पोलिसांकडे तक्रार करण्याची सूचना महाविद्यालयाला देण्यात आली होती.’’
पुष्पलता पवार, सचिव, पुणे विभाग, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

‘विद्यार्थ्यांला मिळालेले गुणपत्रक हा महाविद्यालयाचा कागद नाही. बोर्डाकडून आलेली गुणपत्रके महाविद्यालयाने फक्त विद्यार्थ्यांना वाटली होती. त्यामुळे त्याबाबत महाविद्यालयाने पोलिसांकडे तक्रार का करावी, अशी भूमिका महाविद्यालयाची होती. तरीही याबाबत बुधवारी सायंकाळी विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. याबाबत कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन कार्यवाहीची पुढील दिशा ठरवण्यात येईल.’’
अनंत माटे, सचिव, शिक्षण प्रसारक मंडळी