महापालिका हद्दीत ३८ गावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया राज्य शासनाकडून सुरू असतानाच नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांसाठी वेगळी महापालिका करण्याच्याही हालचालीही शासनदरबारी सुरू झाल्या आहेत. पुणे महापालिकेतून काही भाग वेगळा करून हडपसर महापालिका करण्याबाबतही शासन विचार करत असून हडपसर महापालिकेबाबत अभिप्राय कळवावा असे पत्र राज्य शासनाने महापालिकेला पाठवले आहे.
महापालिकेत २३ गावे समाविष्ट करून यापूर्वी एकदा महापालिकेची हद्दवाढ करण्यात आली होती. त्यानंतर भौगोलिक आणि लोकसंख्यावाढीचा वेग लक्षात घेऊन तसेच महापालिका हद्दीलगतच्या गावांमध्ये होत असलेले बेकायदेशीर बांधकाम लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सुरुवातीला ३४ व त्यानंतर आणखी चार अशी ३८ गावे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यासाठी हरकती-सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यावरील सुनावणी झाली असून पुढील टप्प्यात राज्य शासन ही गावे समाविष्ट करण्याबाबत निर्णय घेईल.
एकीकडे गावांचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांसाठी नवी महापालिका करण्याबाबतही शासनाकडून कार्यवाही सुरू झाली आहे. महापालिकेचे क्षेत्रफळ सध्यापेक्षा दुप्पट होणार असून लोकसंख्याही वाढणार आहे. या विस्तारित क्षेत्राला सध्याच्या महापालिकेकडून सेवा-सुविधा पुरवणे शक्य होणार नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांसाठी नवी महापालिका करावी अशी मागणी उपनगरांमधून होत आहे. त्या दृष्टीने शासनदरबारी देखील आता हालचाल सुरू झाली आहे. हडपसर ही नवी महापालिका करायची झाल्यास या नव्या प्रस्तावित महापालिकेत कोणते भाग वा कोणती गावे समाविष्ट करावीत तसेच हडपसर महापालिकेबाबत पुणे महापालिकेचा अभिप्राय काय आहे अशी विचारणा राज्य शासनाने पुणे महापालिकेकडे केली आहे. महापालिकेकडून नव्या महापालिकेसंबंधीचा अभिप्राय शासनाला गेल्यानंतर शासन प्रस्तावित  महापालिकेबाबत पुढील धोरण निश्चित करेल.
राज्य शासनाने पत्राद्वारे केलेल्या विचारणेनुसार आता पुणे महापालिका प्रशासनाकडून हडपसर महापालिकेबाबत अभिप्राय तयार केला जाणार आहे. तसेच शासनाने महापालिकेकडून अभिप्राय मागवलेला असल्यामुळे प्रशासनाचा अभिप्राय महापालिकेच्या मुख्य सभेपुढे मंजुरीसाठी मांडला जाईल. मुख्य सभा त्यावर निर्णय घेईल व त्यानंतर हा अभिप्राय शासनाला पाठवला जाईल, असे मंगळवारी सांगण्यात आले.