|| भक्ती बिसुरे

‘मुलांना समजून घेताना’: नव्या वर्षांचा उपक्रम :- शालेय मुलांच्या सहवासात सर्वाधिक काळ घालवणारी व्यक्ती म्हणजे त्यांचे शिक्षक होत. मुलांमध्ये वाढत चाललेल्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी, त्यांच्या शिक्षकांनाच त्याबाबत सजग करण्याचा संकल्प राज्यातील मानसोपचार तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे. १ ते १५ जानेवारीदरम्यान राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या शिक्षकांमध्ये ‘मुलांना समजून घेताना’ या उपक्रमाचे आयोजन ‘गाव तिथे मानसोपचार’ या राज्यव्यापी अभियानांतर्गत  करण्यात आले आहे.

राज्यातील मानसोपचार तज्ज्ञांनी मागील वर्षभरापासून ‘गाव तिथे मानसोपचार’ हे अभियान हाती घेतले आहे. शरीराच्या आजारांप्रमाणेच मनाचे आजार असणे नैसर्गिक आहे, मनाचे आजार औषधे आणि समुपदेशनातून बरे करता येतात याबाबत जागृती करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांनी आपल्या कार्यक्षेत्रातील खेडेगाव निवडून, तेथे नियमित भेटी देऊन मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करावी, आवश्यक तेथे उपचार आणि समुपदेशन करावे अशी या अभियानाची संकल्पना आहे. राज्यातील अनेक मानसोपचार तज्ज्ञ स्वयंस्फूर्तीने, तसेच कोणत्याही मोबदल्याशिवाय हा उपक्रम राबवत आहेत. या अभियानाचा पुढील टप्पा म्हणून ‘मुलांना समजून घेताना’ हा उपक्रम  राबवण्यात येणार आहे.

गाव तिथे मानसोपचार उपक्रमाचे सदस्य डॉ. निकेत कासार म्हणाले, जानेवारी महिन्यातील पहिल्या पंधरवडय़ात राज्याच्या सर्व जिल्ह्य़ांमध्ये सुमारे दोनशे मानसोपचार तज्ज्ञ ही चळवळ राबवणार आहेत. मुलांच्या मानसिक आरोग्याबाबत तज्ज्ञांनीच शिक्षकांशी संवाद साधला असता मुलांमध्ये दिसणारे सूक्ष्म बदल टिपणे शिक्षकांना सोपे जाणार आहे. लहान मुलांमध्ये मानसिक आजार किंवा अस्वास्थ्य दिसण्याचे प्रमाण मागील काही वर्षांपासून वाढले आहे, या पाश्र्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा उपक्रम हाती घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. अमोल देशमुख म्हणाले, मुले सर्वाधिक काळ त्यांच्या शिक्षकांच्या नजरेसमोर असतात. एकाच वेळी अनेक मुले सहवासात येत असल्याने एखाद्या मुलाच्या वर्तणुकीत लहानसा बदल जाणवला तरी शिक्षक तो ओळखू शकतात. तो बदल मुलाच्या मानसिक स्वास्थ्याला त्रासदायक असेल तर शाळेच्या स्तरावर तो कसा हाताळावा, आवश्यकता भासल्यास मानसोपचार तज्ज्ञांची मदत कधी आणि कशी घ्यावी याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करणे ही या उपक्रमामागील कल्पना आहे.

बालकांचे मानसिक आरोग्य निकोप राखण्यासाठी उपयोगी

राज्यात सर्वदूर कार्यरत असलेले मानसोपचारतज्ज्ञ आपापल्या परिसरातील शाळांच्या शिक्षकांना एकत्र आणून जागृतीचे काम करणार आहेत. त्यामुळे सध्याच्या धकाधकीच्या काळात मुलांचे मानसिक आरोग्य निकोप राखण्यासाठी हा उपक्रम उपयोगी ठरणार आहे.