दिवाळीनिमित्त मूळ गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना दुप्पट-तिप्पट भाडेआकारणी करून लुबाडणूक करणाऱ्या काही खासगी वाहतूकदारांच्या भाडेवाढीला यंदा राज्य परिवहन महामंडळाने ‘ब्रेक’ लावल्याचे दिसून आले. एसटीकडून प्रवाशांची सर्वाधिक मागणी असलेल्या ठिकाणी हव्या त्या प्रमाणात गाडय़ा सोडण्याबरबोरच वाहतुकीचे योग्य नियोजन झाल्याने खासगी बसची भाडेवाढ काही प्रमाणात रोखण्यात यश मिळाले.
पुण्यात नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. दिवाळीमध्ये यातील बहुतांश नागरिक मूळ गावी परतत असतात. एकाच वेळी मोठय़ा प्रमाणावर प्रवाशांची मागणी आल्यामुळे एसटीच्या गाडय़ाही कमी पडतात. त्यामुळे नाईलाजास्तव अनेकांना खासगी वाहतूकदारांकडे वळावे लागते. खासगी बसच्या भाडय़ावर कोणतेही नियंत्रण नसल्याने मागणी जशी वाढते त्या प्रमाणात खासगी गाडय़ांचे भाडे वाढविले जाते. अनेकदा बसभाडे दुप्पट किंवा तिप्पटही केले जाते. सणासाठी घरी पोहोचायचे असल्याने हे भाडे देण्यावाचून नागरिकांना पर्याय राहात नाही.
एसटीच्या वतीने दरवर्षी दिवाळीत जादा गाडय़ा सोडण्यात येतात. यंदा मात्र खासगी वाहतूकदारांशी असलेली स्पर्धा लक्षात घेऊन गाडय़ांचे नियोजन करण्यात आले होते. शहरातील बसथांब्यांबरोबरच निगडी तसेच सांगवी येथे नव्याने निर्माण झालेल्या थांब्यावरून जादा गाडय़ा सोडण्यात आल्या. मार्केट यार्डमधील गंगाधाम व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरूनही जादा गाडय़ा सोडण्यात आल्या. वातानुकूलित गाडय़ांनी जाणारा प्रवासी लक्षात घेता शिवनेरी गाडीचाही प्राधान्याने विचार केला गेला. प्रामुख्याने पुणे-नागपूर या मार्गावर स्लीपर कोच वातानुकूलित गाडय़ांना चांगली मागणी असते. याच मार्गावर खासगी गाडय़ांकडून मनमानी भाडेआकारणी केली जाते. ही बाब लक्षात घेऊन एसटीने यंदा या मार्गावर दररोज दोन गाडय़ा सोडल्या होत्या. पुणे-बंगळुरू या मार्गावरही शिवनेरी सोडण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून आपोआपच खासगी गाडय़ांची मागणी कमी होऊन त्यांचे भाडेही काही प्रमाणात नियंत्रणात राहिले.
एसटीच्या वतीने यंदा सुनियोजितपणे गाडय़ा सोडण्यात आल्या. एक गाडी प्रवाशांनी भरली की लगेचच त्या मार्गावर दुसरी गाडीही तयार ठेवण्यात आली होती. ठराविक प्रवासी असतील, तर त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाहूनही गाडी सोडण्याचे नियोजन केले होते. दिवाळीच्या कालावधीमध्ये अडीच हजार जादा गाडय़ा विविध मार्गावर सोडण्यात आल्या. वातानुकूलित शिवनेरी गाडय़ाही सोडण्यात आल्या. स्थानकाच्या आवारात होर्डिग लावून प्रथमच या गाडय़ांची जाहिरात करण्यात आली. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पुढच्या वेळी शिवनेरी गाडय़ांबाबत अधिक चांगले नियोजन करण्यात येणार आहे.
– शैलेश चव्हाण
एसटी, विभाग नियंत्रक