केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची टीका

पुणे : देशाची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचे नोबेलविजेते, अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांचे विधान चुकीचे आहे. बॅनर्जी डाव्या विचारसरणीचे आहेत. त्यांनी काँग्रेसच्या न्याय योजनेचेही कौतुक केले होते. मात्र ही योजना पूर्णपणे अपयशी ठरली आणि जनतेनेही काँग्रेसला नाकारले. तसेच बॅनर्जी यांची विचारसरणीही नाकारण्यात आली आहे, अशी टीका रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केली.

गोयल म्हणाले, की मोदी सरकारने अर्थव्यवस्था अधिक सक्षम केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे देशातील उद्योग वाढले आहेत. मनमोहन सिंग यांच्या काळात उद्योगांचा कधीच विचार करण्यात आला नाही. काँग्रेस सरकारच्या काळात चारा घोटाळा, कोळसा, सिंचन, आदर्श घोटाळे  झाले, अर्थव्यवस्था कोलमडली. मनमोहनसिंग यांनी केवळ स्वत:ची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले. भाजप सरकारवर टीका करण्यापेक्षा तत्कालीन काँग्रेस सरकारने काय केले, हे त्यांनी सांगावे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी यांनी देशातील अर्थव्यवस्थेबाबत पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. या पाश्र्वभूमीवर पीयूष गोयल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बॅनर्जी यांच्यावर टीका केली.