भाजप खासदार संजय काकडे यांच्या मुलीच्या शाही विवाह सोहळ्यावरुन वाद सुरु असतानाच काकडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे २ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीतून येणाऱ्या व्याजाचा वापर गरजू मुलांच्या शिक्षणासाठी केला जाणार असून जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी देऊन काकडे यांनी शाही सोहळ्यावरुन सुरु असलेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आता रंगली आहे.

मंत्र्यांच्या घरी लग्न असले की कायमच पैशांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप होत असतो. असाच आरोप भाजप खासदार संजय काकडे यांच्यावरही करण्यात आला होता. काकडे यांची कन्या आणि राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मुलाच्या शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडत आहे. लग्नात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात येत असल्यानं काकडेंवर टीकेची झोड उठविण्यात आली होती.

मात्र त्यावर सारवासारव करण्यासाठी आपली बाजू मांडली आहे. राज्यातील गरजू मुलांना आपण तब्बल दोन कोटींची मदत करणार आहोत असे संजय काकडे यांनी पत्रकाव्दारे सांगितले. यासाठी 100 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून प्रत्येक विद्यार्थ्याला एक लाख रुपयांपर्यंतची मदत मिळू शकणार आहे, असं स्पष्टीकरण काकडे यांनी दिलं आहे. या १०० विद्यार्थ्यांच्या निवडीचे अधिकार जिल्हाधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांनी निवडलेली एक स्वयंसेवी संस्था तसेच गठित केलेल्या समितीला असतील असेही या पत्रकात स्पष्ट कऱण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात चिंचवड येथे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची जी बैठक झाली त्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींशी संवाद साधताना पक्षात व्हीआयपी संस्कृती आणू नका, असे स्पष्टपणे सांगितले होते. ‘या संस्कृतीत जाऊ नका. भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे. मात्र सत्तेने उन्मत्त होऊ नका असा सल्ला दिला होता.