कुख्यात गुंड गजा मारणे आणि त्याच्या टोळीतील नऊजणांवर एक वर्षांसाठी केलेल्या तडीपारीला थेट मंत्रालयातून स्थगिती देण्यात आली आहे. गणेशोत्सव व विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मारणेसह दहाजणांस पुणे जिल्ह्य़ातून तडीपारीचे आदेश पोलीस उपायुक्त एम. बी. तांबडे यांनी दिले होते. मात्र, त्यांच्या आदेशाला मंत्रालयातून स्थगिती मिळाल्यामुळे गुन्हेगारी कशी कमी करायची, असा प्रश्न पोलीस अधिकारी विचारत आहेत.
मारणे टोळीवर मारामारी, खुनाचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी देणे, दरोडा, संघटित गुन्हेगारी, तसेच समाजिकदृष्टय़ा संवेदनशील व फौजदारी अतिक्रण अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव आणि आगामी विधानसभा निवडणुका यांच्या पाश्र्वभूमीवर पोलीस उपायुक्त एम. बी. तांबडे यांनी दहाजणांस एका वर्षांसाठी पुणे जिल्ह्य़ातून तडीपार केले आहे. यामध्ये मारणे टोळीतील सदस्य बाब्या ऊर्फ श्रीकांत संभाजी पवार (वय २५, रा. हमराज चौक, कोथरूड), प्रदीप दत्तात्रय कंधारे (वय २८), गणेश नामदेव हुंडारे (वय १९), शशांक मारुती बोडके (वय २३), अमोल विनायक तापकीर (वय २२, रा, सर्वजन, शास्त्रीनगर, कोथरूड), शेखर दत्तात्रय आडकर (वय २३, मंत्री उद्यानाजवळ, कोथरूड), रुपेश कृष्णराव मारणे (वय २८, शास्त्रीनगर, कोथरूड), अनंता ज्ञानोबा कदम (वय २७, रा. गुजराथ कॉलनी, कोथरूड) आणि सुनील नामदेव बनसोडे (वय ३१, रा. सागर कॉलनी, कोथरूड) यांना तडीपार केले होते. या तडीपारीला मारणेचे वकील अॅड. शेखर जगताप आणि अॅड. विजय ठोंबरे यांनी आव्हान दिले होते. २ सप्टेंबर रोजी याबाबत सुनावणी झाली. त्यावेळी जगताप यांनी मारणे याची बाजू मांडली. त्यानंतर गृह विभागाच्या सहसचिवांनी पोलीस उपायुक्तांच्या तडीपारीला स्थगिती दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मारणे यांनी विधानसभेच्या उमेदवारीसाठी मुलाखत दिली होती. त्यानंतर करण्यात आलेली तडीपारी ची कारवाई ही राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली होती, असे अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी सांगितले.