केंद्र सरकारने ‘ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर’ अनुसार (डीपीसीओ) जाहीर केलेल्या स्वस्त किमतीची औषधे कंपन्यांकडून हळूहळू बाजारात येऊ लागली असली, तरी नवीन माल पुरेसा नसल्याने शहरात काही औषधांचा तुटवडा आहे. बहुसंख्य औषध विक्रेत्यांनी जुन्या किमतीची औषधे कंपन्यांना परत पाठवली असून काही विक्रेते मात्र पुरेशा मालाअभावी अजूनही जुन्या महाग किमतीची औषधे विकत असल्याचे चित्र आहे. तुटवडय़ापेक्षा औषध मिळणे गरजेचे, अशी भावना असलेले रुग्णही महाग किंमत मोजून औषध खरेदीस तयार होत आहेत.
नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अॅथॉरिटीने (एनपीपीए) डीपीसीओ अनुसार ३४८ औषधी घटक द्रव्यांच्या किमती कमी केल्या आहेत. या नव्या किमती तीन टप्प्यांत लागू होणार असून त्यातील दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील औषधांच्या जुन्या किमतींची मुदत १४ ऑगस्टला संपणार आहे. रक्तदाबावर वापरल्या जाणाऱ्या अॅम्लोडिपिन गोळ्या, सर्दी, शिंका, डोळ्यांत पाणी येणे अशा लक्षणांवर वापरल्या जाणाऱ्या सेट्रिझिन गोळ्या तसेच इंजेक्शनमधून दिल्या जाणाऱ्या औषधांचा सध्या तुटवडा जाणवत आहे.
डीपीसीओची अंमलबजावणी औषध उत्पादकांपासून सुरू होणे गरजेचे होते, असे काही औषधविक्रेत्यांचे म्हणणे आहे. विकायला पुरेसा स्वस्त माल नाही, जुना माल महाग विकण्यास बंदी या परिस्थितीत किरकोळ औषधविक्रेत्यांना तोटा सोसावा लागत असून परिणामी रुग्णांना तुटवडय़ाचा सामना करावा लागत असल्याचे मत या विक्रेत्यांनी व्यक्त केले.