शिक्षण विभागाने एखाद्या धोरणात्मक निर्णयाची अंमलजबावणी सुरू करायची आणि मंत्र्यांनी उलटीच घोषणा करून गोंधळ निर्माण करायचा.. ही परंपरा नव्या सरकारमध्येही सुरूच आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून (२०१५-१६) तीन वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच पूर्वप्राथमिक वर्गामध्ये प्रवेश देण्याच्या शासनाच्याच निर्णयाची अंमलबजावणी ही पुढील वर्षांपासून करण्यात येणार असल्याचे ट्विट शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. तावडे यांच्या या नव्या पवित्र्यामुळे आता शिक्षण विभागात पुन्हा एकदा नवा गोंधळ सुरू झाला आहे.
राज्यातील पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक वर्गाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या वयाचे निकष निश्चित करणारा शासन निर्णय नुकताच जाहीर झाला. येत्या शैक्षणिक वर्षांपासून (२०१५-१६) पूर्व प्राथमिक वर्गाच्या प्रवेशासाठी आणि त्यानंतर २०१८ पर्यंत टप्प्याटप्याने पहिलीच्या प्रवेश प्रक्रिया नव्या निकषांनुसार करण्याचेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. गेले तीन महिने शासन दरबारी याबाबतचा प्रस्ताव धूळखात होता, त्यावर अखेर निर्णय झाला. निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षांपासूनच होणार असल्यामुळे शिक्षण विभागही कामाला लागला. मात्र, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलेल्या ट्विटमुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत आता नवा गोंधळ सुरू झाला आहे.
तावडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘१ जानेवारीपूर्वीच झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी नव्या शैक्षणिक वर्षांपासून होणार असल्याचे यापूर्वीच विधानसभेत जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार वयाबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणीही पुढील वर्षीपासून (२०१६-१७) करण्यात येईल.’ मंत्र्यांच्याच संमतीने निर्णय झाल्यानंतर आता त्यांच्या बदललेल्या पवित्र्यामुळे शिक्षण विभागातील अधिकारी पेचात पडले आहेत.