पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या बहुतेक महाविद्यालयांमध्ये अद्यापही विशाखा समित्या किंवा महिलांसाठी तक्रार निवारण समित्या अस्तित्वातच नाहीत. त्यामुळे तक्रार करायची तरी कुठे असा प्रश्न महिला शिक्षक आणि विद्यार्थिनींना पडला आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांना होणाऱ्या त्रासाच्या पाश्र्वभूमीवर प्रत्येक संस्थेमध्ये विशाखा समिती असावी, असा नियम आहे. मात्र, पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पन्नास टक्क्य़ांहून अधिक महाविद्यालयांमध्ये अद्यापही विशाखा समिती स्थापनच करण्यात आलेली नाही. विद्यार्थिनींच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी महाविद्यालयांच्या पतळीवर एखादी समिती किंवा एखाद्या शिक्षिकेची नेमणूक करण्यात येते. मात्र, महाविद्यालयांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षिका आणि महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत महाविद्यालये गंभीर दिसत नाहीत. ही परिस्थिती पुण्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये नसली, तरी बहुतेक महाविद्यालयांमध्ये अशीच अवस्था आहे. काही महाविद्यालयांमध्ये समित्या स्थापन केल्या आहेत मात्र, त्या कागदावरच आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार महिलांच्या सुरक्षेसाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा अहवाल विद्यापीठाने पाठवायचा होता. त्या अहवालानुसार विद्यापीठाशी संलग्न असलेल्या आठशे महाविद्यालयांपैकी साधारण तीनशे महाविद्यालयांमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले होते. मात्र, या समुपदेशन केंद्रांबाबत महिला शिक्षिका आणि कर्मचाऱ्यांना मात्र काहीच माहिती नाही. अगदी महाविद्यालयांमध्येही काही वेळा सहकाऱ्यांकडून वाईट अनुभव येत असल्याचे शिक्षिकांनी सांगितले. मात्र, घडणाऱ्या गोष्टींची तक्रार करण्यासाठी महिला शिक्षिकांना आजही महाविद्यालयांमध्ये हक्काची जागा नाही. काही ठिकाणी तक्रार निवारण समिती असली, तरी त्याचे प्रमुखपद पुरुष सहकाऱ्यांकडे आहे. त्यामुळे तक्रार करण्यासाठी महिला पुढे येत नसल्याचे निरीक्षणही कर्मचाऱ्यांनी नोंदवले आहे. पदोन्नतीच्या काळात किंवा बदलीच्या काळात अनेकींना सहकारी, संस्थाचालक किंवा अगदी प्राचार्याकडूनही वाईट अनुभव येतात. मात्र, त्याबाबत तक्रार करण्यासाठी कर्मचारी किंवा शिक्षिका पुढे येत नाहीत. सर्वच घटनांची पोलिसांकडे तक्रार करता येत नाही. मात्र, त्याचा महिला म्हणून मनस्ताप होत असतो,’ असे काही महिला प्राध्यापकांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.
 
‘‘अशा घटना घडू शकतात. यापुढे प्रत्येक महाविद्यालयामध्ये विशाखा कायद्यानुसार सर्व गोष्टी पूर्ण करणे बंधनकारक आहे. यापुढे आम्ही ज्या महाविद्यालयांमध्ये जाऊ तेथे आवर्जून विशाखानुसार सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली आहे का याची खातरजमा करू. संघटनेकडूनही या प्रश्नाकडे लक्ष दिले जाईल.’’
– हेमलता मोरे, अध्यक्ष, पुणे युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन