प्रेयसी आणि दारूसाठी ठेकेदाराकडून उसने पैसे घेतले होते. ते फेडण्यासाठी प्रियकर आरोपीने चक्क १९ दुचाकींची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्ञानेश्वर उर्फ विशाल उत्तम मेटांगळे (वय-२१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने चाकण परिसरातून ५ लाख ७० हजार रुपयांच्या दुचाकी चोरल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मेटांगळेचे एका महिलेसोबत प्रेम प्रकरण आहे, तसेच, त्याला दारूचे व्यवसनही असल्याने त्याने एका ठेकेदाराकडून पैसे देखील उसने घेतले होते. या पैशांमधुन त्याने प्रेयसीची हौस भागवली तर उरलेले पैसे दारूत घालवले. अखेर सर्व पैसे संपल्याने आता ठेकेदाराकडून घेतलेले उसने पैसे कसे परत करायचे असा त्याला प्रश्न पडला होता. या विचारातून त्याने चोरी करण्यास सुरुवात केली व तब्बल १९ दुचाक्या चाकण, पिंपरी, भोसरी आणि तळेगाव परिसरातून चोरल्या. दरम्यान, ही माहिती पोलीस कर्मचारी सचिन उगले यांना मिळाली. शिवाय आरोपी मेटांगळे हा चाकण परिसरात आल्याचे देखील त्यांना खबऱ्यामार्फत समजले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांना सविस्तर माहिती देऊन याबाबत खात्री करण्यात आली व यानंतर संबंधित ठिकाणी कारवाई करत चोरीच्या दुचाकींसह आरोपी मेटांगळेला पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्याने आपण उसने पैसे परत करण्यासाठी हा उपद्वाप केल्याचे सांगितले.

तसेच चोरीच्या दुचाक्या उमाकांत अरूणसिंग साळुंके आणि मनोज हरिभाऊ वाघमारे यांना विक्री केल्याचेही सांगितले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, उप-पोलीस निरीक्षक गिरीश चामले, पोलीस कर्मचारी सचिन उगले, विवेकानंद सपकाळ, हजरत पठाण, दादा पवार, रमेश गायकवाड, विनोद साळवे, अरुण नरळे यांनी केली आहे.