रामटेकडी येथील एका धार्मिक स्थळाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण पथकावर जमावाने दगडफेक केली. यामध्ये महापालिकेचे सहायक आयुक्त सुकुमार पाटील हे जखमी झाले असून तीन पीएमपीएल बस आणि नऊ मोटारींचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेकडी येथील सव्‍‌र्हे नंबर ११० येथे अनधिकृत धार्मिक स्थळ बांधण्यात आले आहे. महापालिकेने एक महिन्यांपूर्वी ती हटविण्याची नोटीस दिली होती. मात्र, ती न हटविल्यामुळे मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्त घेऊन अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. अतिक्रमण काढण्याचे काम पूर्ण होत आलेले असताना अचानक मोठा जमाव आला.                                                                                                 जमावाकडून अतिक्रमण हटविणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दिशेने तुफान दगडफेक करण्यास सुरुवात झाली. तसेच, रामटेकडी उड्डाणपुलावरील तीन पीएमपीएल बसवरही दगडफेक करण्यात आली. यामध्ये नऊ ते दहा मोटारींचे नुकसान झाले. शीघ्र कृती दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत पाटील हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.