तापमानात पुन्हा विचित्र बदल ; मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात गारपिटीचा इशारा

करोनाचा कहर सुरू असतानाच राज्याच्या बहुतांश भागात पुन्हा वादळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी मध्य महाराष्ट्रात नगर येथे वादळी पाऊस, तर पुण्यासह काही ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली. पुढील तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रातही गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात सध्या तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढला आहे.

मंगळवारी दुपारी दिवसाच्या तापमानात लक्षणीय वाढ झाली होती. अकोला येथे उच्चाकी ४० अंश तापमानाची नोंद झाली. पुणे, नाशिकसह मध्य महाराष्ट्र आणि मुंबईसह कोकण विभागात दिवसाच्या तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे गेला आहे. रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे.

मंगळवारी दुपारनंतर बहुतांश ठिकाणी आकाश ढगाळ झाले. नगरमध्ये सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पाऊस झाला. पुण्यात सिंहगड रस्ता, धायरी परिसरात हलक्या पावसाची हजेरी होती. मराठवाडय़ात औरंगाबाद, बीड, जालना या भागात ढगाळ स्थिती होती.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार २५ मार्चला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी सोसाटय़ाचा वारा आणि विजांच्या कडकडाटात गारांचा पाऊस होण्याची शक्यता आहे. २६ मार्चलाही मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात विजांच्या कडकडाटात पाऊस, तर विदर्भात गारांचा पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. २७ आणि २८ मार्चला या तीनही विभागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

तापभान..

* पश्चिम विदर्भापासून तमिळनाडूपर्यंत सध्या हवेच्या कमी दाबाचा पट्टा आहे. बंगालच्या उपसागरावरून बाष्पाचा पुरवठा सुरूच आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान निर्माण झाले आहे.

* गेल्या आठवडय़ामध्ये मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली होती. अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला.

* मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाची हजेरी होती. त्यानंतर मंगळवारपासून (२४ मार्च) पुन्हा या भागात आणि कोकण विभागातही पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.