नवनियुक्त महानिरीक्षक हर्डीकर यांची ग्वाही

पुणे : राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्यानोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या बहुतांशी सेवा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे त्यामध्ये सातत्याने अडथळे येत आहेत. या सेवा जलद, विनाअडथळे कार्यरत राहण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे नवनियुक्त नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी दिली.

नोंदणी महानिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर हर्डीकर यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला. ते म्हणाले, ‘नागरिकांच्या सोयीसाठी विभागाच्या बहुतांशी सेवा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. या सेवा सुरळीत कशा सुरू राहतील, यासाठी कटाक्षाने प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच विभागाशी संलग्न असलेल्या शासकीय जमा लेखाप्रणाली (गव्हर्नन्मेंट रिसिप्ट अकौंटिंग सिस्टीम – ग्रास), भूमी अभिलेख यांमधील अडथळे देखील कमी करण्यात येणार आहेत. ऑनलाइन सेवांमध्ये आवश्यक सुधारणा लवकरच के ल्या जातील.’

मुद्रांकावरील भाडेकरारांना कायद्याचे संरक्षण राहिले नसून ऑनलाइन भाडेकरारच आता कायद्याने अधिकृत ठरत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त भाडेकरार होण्यासाठी प्रयत्न के ले जाणार आहेत. विभागाच्या जास्तीत जास्त सेवा नागरिकांना ऑनलाइन देण्याचा प्रयत्न राहणार आहे.

विकसकाकडून होणारा विक्री करारनामा ऑनलाइन करणे, मूल्यांकन, नोंदणी ही सर्व प्रक्रिया सोपी करण्याचा प्रयत्नही के ला जाणार आहे. तीन टप्प्यांमध्ये या सर्व सुधारणा के ल्या जातील, असेही हर्डीकर यांनी सांगितले.

अहवाल आल्यानंतर योग्य ती कार्यवाही

शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये नोंद झालेल्या व संशयित दस्तांची सध्या तपासणी करण्यात येत आहे. त्याकरिता विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकाने अहवाल दिल्यानंतर त्यावर योग्य ती कार्यवाही के ली जाईल, असेही हर्डीकर यांनी स्पष्ट केले.