शहराचा विस्तार वेगाने होत असल्यामुळे वाहतुकीचे प्रश्न आणि वाढती गुन्हेगारी या समस्यांना अपुऱ्या मनुष्यबळामध्ये पोलीस तोंड देत आहेत. त्यात शहरात अलीकडे विशेष व अतिविशेष व्यक्तींच्या फेऱ्या मोठय़ा प्रमाणात वाढल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा अतिरिक्त ताण पोलिसांवर पडत आहेत. मागील महिन्यात व्हीआयपींच्या तब्बल २०१ फेऱ्या पुण्यात झाल्यामुळे पोलीस हैराण झाले आहेत.
 शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, आयटी हब, लष्कराचे दक्षिण मुख्यालय अशा अनेक नावाने पुणे ओळखले जाते. त्यामुळे शहरात विविध कार्यक्रम असतात. त्याला देशाच्या राष्ट्रपतींपासून ते शास्त्रज्ञ, राज्यपाल, मुख्यमंत्री व इतर नेत्यांची ये-जा सुरू असते. मात्र, अलीकडे पुण्यात येणाऱ्या व्हीआयपींची मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. पुणे शहराच्या वाढता विस्ताराच्या तुलनेत पोलिसांची संख्या खूपच कमी आहे. आहे त्या मनुष्यबळात गुन्हेगारी थांबवणे, तपास करणे, वाहतूक नियमन करणे अशी कामे पोलिसांना करावी लागत आहेत. मात्र, अलीकडे पोलिसांचे एक चतुर्थाश मनुष्यबळ हे व्हीआयपींच्या बंदोबस्तातच जात आहे.
दोन राज्यांचे राज्यपाल, माजी राष्ट्रपती यांची पुण्यात घरे आहेत. त्याच बरोबर निवडणुकीचे वातावरण तापू लागल्यामुळे केंद्रीय मंत्र्यांबरोबरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्री यांचे दौरे पुण्यात सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांना व्हीआयपींसाठी कायम काही कर्मचारी तैनातीसाठी ठेवावे लागत आहेत. व्हीआयपींच्या दौऱ्यावेळी त्यांना पायलट व एस्कॉर्टसोबत अतिरिक्त बंदोबस्तही द्यावा लागतो. त्याचबरोबर ज्या भागात जावे लागते त्या भागातील वाहतूक पोलिसांना त्यांच्या दिमतीला उभे राहावे लागते. एका व्हीआयपीसाठी साधारण शंभर पोलिसांचा बंदोबस्त द्यावा लागतो. एका दिवसातच त्या व्हीआयपी व्यक्तींचे शहरात चार-पाच दौरे असतील तर तीनशे ते चारशे लोक बंदोबस्ताला ठेवले जातात.
गेल्या महिन्यात शहरात आतापर्यंतचे सर्वाधिक व्हीआयपी दौरे झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक वेळा माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना ४६ वेळा, त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन ३३, उपमुख्यमंत्री अजित पवार २३, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण १८, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार ७ यांच्याबरोबरच हर्षवर्धन पाटील, आर. आर. पाटील, सुशीलकुमार शिंदे, नरेंद्र मोदी, दलाई लामा, प्रिन्स पायलट यांनी जुलैमध्ये भेटी दिल्या आहेत.
शनिवार व रविवार झालेत ‘व्हीआयपी डे’
शहरात शनिवार व रविवार अनेक कार्यक्रम असतात. त्याचबरोबर काही मंत्र्यांची घरे पुण्यात असल्यामुळे ते हे दोन दिवस पुण्यात असतात. त्यामुळे या दोन दिवशी शहरात सर्वाधिक व्हीआयपी भेट देतात. एका दिवशी शहरात किमान तीन ते दहा  व्हीआयपी असतात. त्यामुळे पोलिसांना सुट्टय़ा रद्द करून कामावर या दिवशी कधी-कधी यावे लागले आहे. तसेच, काही वेळा साखळी चोऱ्या रोखण्यासाठी तैनात केलेला बंदोबस्त व्हीआयपींसाठी लावावा लागला आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.