पुण्याच्या पोलीस आयुक्तांचा इशारा; कायदा-सुव्यवस्थेला बाधा येऊ न देण्यासाठी पोलीस सज्ज

पुणे : कायदा आणि सुव्यस्थेला बाधा तसेच नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांविरोधात यापुढील काळात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. गुंडांनी वेळीच सुधारावे अन्यथा त्यांना ठोकून काढू, असा इशारा पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.

तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर कोथरूडमधील गुंड गजानन उर्फ गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांनी द्रुतगती मार्गावर धुडगुस घातल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी मंगळवारी रात्री मारणेसह त्याच्या आठ साथीदारांना अटक केली तसेच त्याच्याबरोबर असलेल्या २०० साथीदारांविरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. २६ जानेवारी रोजी गुरुवार पेठेत शक्तिप्रदर्शन करणारा मुळशीतील गुंड शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. पोलिसांनी एकापाठोपाठ शहरातील दोन गुंडांविरोधात कारवाई केल्याने गुंडांना जरब बसली आहे.

या कारवाईनंतर ‘लोकसत्ता’शी  बोलताना पोलीस आयुक्त गुप्ता म्हणाले, ‘शहरातील गुंडांना जरब बसविण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. सामान्यांना वेठीस धरणाऱ्या गुंडांची अजिबात खैर केली जाणार नाही. शक्तिप्रदर्शन करणे तसेच जमाव जमविणे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. कायदा-सुव्यस्थेला बाधा पोहोचविणाऱ्या गुंडांविरोधात यापुढील काळातही कडक  कारवाई करण्यात येणार आहे. गुंडांनी वेळीच सुधारावे, अन्यथा त्यांना ठोकून काढू’.

नागरिकांच्या रक्षणासाठी पोलीस आहेत. मी नागरिकांना उत्तर देण्यास बांधील आहे. सामान्यांना त्रास देणाऱ्या गुंडांविरोधात कडक कारवाईची मोहीम यापुढील काळात तीव्र करण्यात येणार आहे. तळोजा कारागृहातून बाहेर पडलेल्या गजा मारणेला मंगळवारी कोथरूड पोलीस ठाण्यात आणून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांकडून अशा प्रकारची कारवाई होईल, याची पुसटशीही कल्पना मारणेला नव्हती. या कारवाईतून गुंडांनी धडा घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

मारणेवरील  कारवाई म्हणजे ‘ट्रेलर’

एखादा नवीन चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटातील काही भाग (ट्रेलर) प्रसारित करण्यात येतात. गजा मारणेवर केलेली कारवाई म्हणजे ‘ट्रेलर’च आहे. त्यामुळे या पुढील काळात सामान्यांना त्रास देणाऱ्या गुंडांविरोधात कोणताही मुलाहिजा न बाळगता कारवाई केली जाणार आहे, असा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला.