30 March 2020

News Flash

मराठीच्या संवर्धनासाठी कठोर निर्णयांची गरज

इंग्रजी बोलता आले नाही, तर जगाच्या मागे पडू, हा न्यूनगंड मराठी माणसाच्या मनात खोल रुजला आहे.

निगडीतील मधुश्री कला आविष्कार संस्था आयोजित व्याख्यानमालेचे उद्घाटन डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेच्या संस्थापक माधुरी ओक, कार्याध्यक्ष सलीम शिकलगार, शैलजा मोरे, राधिका बोर्लीकर आदी उपस्थित होते.

मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचे मत
इंग्रजी बोलता आले नाही, तर जगाच्या मागे पडू, हा न्यूनगंड मराठी माणसाच्या मनात खोल रुजला आहे. इंग्रजी आत्मसात करत असताना मराठीचे संवर्धन आणि सक्षमीकरणासाठी शासनाने कठोर निर्णय घेणे भाग आहे, असे मत मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी निगडीत व्यक्त केले.
मधुश्री कला आविष्कार आयोजित व्याख्यानमालेचे डॉ. मोरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर, ‘मराठी, काल, आज आणि उद्या’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शैलजा मोरे होत्या. संस्थापक माधुरी ओक, कार्याध्यक्ष सलीम शिकलगार आदी उपस्थित होते.
मोरे म्हणाले, महाराष्ट्रात १२ कोटी लोक मराठी आहेत. जगात १५ व्या क्रमांकावर मराठी भाषा आहे. ज्ञानेश्वरांच्या काळातील तसेच शिवछत्रपतींच्या व तुकोबांच्या काळातील मराठी, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील आजची मराठी यात लक्षणीय बदल झालेले आहेत. सातवाहन राज्याच्या ४०० वर्षांच्या कालखंडात मराठी भाषेला अतिशय महत्त्व होते. मात्र, त्यानंतरच्या राजघराण्यांनी मराठी थारा दिला नाही. परिणामी, तिची पीछेहाट झाली. बाराव्या शतकात यादवांचे राज्य आल्यानंतर मराठी भाषेला ऊर्जितावस्था लाभली. ‘लीळाचरित्र’ व ‘ज्ञानेश्वरी’मुळे प्राकृत मराठीने सुवर्णयुग अनुभवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहारकोश मराठीतून सिद्ध केला. ब्रिटिश सत्तेनंतर मराठी पुन्हा मागे पडली. भाषावार प्रांतरचना होऊनही मराठीची उपेक्षाच झाली. मराठी माणूसही टिकला पाहिजे आणि मराठी भाषाही टिकली पाहिजे, असे वाटत असल्यास मराठीबरोबर इंग्रजी आत्मसात करणे, याला पर्याय नाही. राजसत्तेला त्यासाठी काही कठोर निर्णय घेणे भाग्य आहे.
प्रास्तविक सलीम शिकलगार यांनी केले. उज्ज्वला केळकर यांनी सूत्रसंचालन केले. रमेश वाकनीस यांनी आभार मानले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2016 6:41 am

Web Title: strict decisions need for marathi conservation
टॅग Marathi
Next Stories
1 नद्याची अवस्था गटारांप्रमाणे
2 द्रुतगती मार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रामध्ये ‘बायफ्रेन रोप’ बसविणार
3 चव्हाण रूग्णालयातील अनागोंदी कारभार
Just Now!
X