पुणे शहरातील करोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील चार भागांमध्ये संचारबंदीची कडक अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातला अध्यादेशही निघाला असून आज (दि.७) रात्री ७ वाजल्यापासून १४ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच या काळात रुग्णालयं आणि मेडिकल्स वगळता इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकानं केवळ दोनच तास खुली राहणार आहेत.

पुणे शहरात आधीच संचारबंदी लागू असताना देखील काही भागात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. परस्पर संपर्कामुळे या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढल्याने शहरातील काही भागांमध्ये पूर्वीच्या आदेशांमध्ये अंशतः बदल करुन नवे आदेश लागू करण्यात आले आहेत. यामध्ये संचारबंदी अधिक कडक करण्याचे निश्चित करण्यात आल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

चार पोलीस स्टेशन्सच्या हद्दीत होणार कडक अंमलबजावणी

यासंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशात पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे म्हणतात, “खडक, फरासखाना, स्वारगेट, कोंढवा या चार पोलीस स्टेशनच्या हद्दींमध्ये कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर, गल्लोगल्ली संचार करणे, वाहतुक करणे, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्यांना मनाई करण्यात आली आहे. ७ एप्रिल २०२० पासून संध्याकाळी ७ वाजल्यापासून १४ एप्रिल २०२० रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.”

नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व सेवा दोनच तास उपलब्ध

कडक संचारबंदीचे नवे आदेश लागू झालेल्या भागातील जीवनावश्यक वस्तू व सेवा (दूध व दुग्धोत्पादन, किराणा माल, फळं व भाजीपाला) पुरवणारी दुकानं केवळ दोन तासांसाठीच (सकाळी १०.०० ते दुपारी १२.००) खुली राहणार आहेत. या दुकानांमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जाणीवपूर्वक गर्दी टाळण्याची जबाबदारी दुकानदारांवर असेल. तसेच यासाठी आवश्यक सोशल डिस्टंसिंगचे भानही ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा अशी दुकानं पोलिसांकडून बंद करण्यात येणार आहेत. तसेच या प्रतिबंधीत भागांमध्ये बँकांनी ग्राहकांना बँकिंग सुविधांसाठी केवळ एटीएम केंद्रचं उघडी ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मनाई आदेशातून या व्यक्ती आणि सेवांना असेल सवलत

संचारबंदीच्या या मनाई आदेशातून पोलीस, संरक्षण दल, आरोग्य विभाग, दवाखाना, औषधालय, अत्यवस्थ रुग्णाची वाहतूक, करोनाबाबत काम करणारे महापालिकेचे कर्मचारी आणि शासकीय कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांना सूट असेल. मात्र, यासाठी त्यांना ओळखपत्र, आवश्यक कादगपत्रे, नेमणुकीबाबतचे आदेश सोबत बाळगणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नागरिकांना विविध कारणांसाठी देण्यात आलेली शासकीय वाहन व्यवस्थेची सवलत रद्द करण्यात आली आहे. या व्यक्ती व सेवा वगळता इतर व्यक्तींना कामाच्या ठिकाणी जाणं आवश्यक असल्यास संबंधित अस्थापनांनी त्यांची कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देणं गरजेचं आहे.