भीमा-कोरेगाव येथील हिंसाचार प्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर एकबोटे यांच्या शिवाजीनगर भागातील रेव्हेन्यू कॉलनीत असलेल्या निवासस्थानाच्या परिसरात पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकबोटे यांच्या निवासस्थानाला बाहेरून कुलूप लावण्यात आले असून एकबोटेंविषयी पोलिसांनाही फारशी माहिती नाही. दरम्यान, एकबोटे यांच्या निवासस्थानावर बुधवारी दुपारी मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केली.

भीमा-कोरेगाव येथील हिंसाचार प्रकरणी श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध मंगळवारी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दंगल भडकाविणे तसेच अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत (अ‍ॅट्रोसिटी) या कलमांन्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमा-कोरेगाव येथील हिंसाचार प्रकरणी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आल्यानंतर बुधवारी सकाळी दांडेकर पुलापासून एकबोटेंच्या निवासस्थानापर्यंत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. सकाळी दांडेकर पूल भागातून मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांकडून मोर्चाला आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर मोर्चा स्थागित करण्यात आला.

एकबोटेंचे निवासस्थान शिवाजीनगर भागातील रेव्हेन्यू कॉलनी परिसरात आहे. या भागात पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेले दोन दिवस एकबोटेंच्या निवास्थानाच्या परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला असून बुधवारी सकाळी राज्य राखीव दलाच्या तुकडीला बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले. एकबोटेंचे निवासस्थानी मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले. याबाबत बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांकडे विचारणा करण्यात आली. तेव्हा एकबोटे घरी नसल्याचे बंदोबस्तास असलेल्या पोलिसांकडून सांगण्यात आले. एकबोटे यांच्या निवासस्थानी जाणारा रेव्हेन्यू कॉलनीतील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून तेथे लोखंडी कठडे लावण्यात आले आहेत. पोलिसांची मोठी व्हॅन एकबोटेंच्या निवासस्थानासमोर लावण्यात आली आहे. दरम्यान, दुपारी तीनच्या सुमारास एकबोटेंच्या निवासस्थानी आंदोलकांकडून मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आल्यानंतर या भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता.