News Flash

कडक नियमांमुळे नेटच्या उमेदवारांची ‘परीक्षा’

कडक नियम आणि सीबीएसईनेच वाटलेली पेन्स यांमुळे ही परीक्षा उमेदवारांमध्ये चर्चेची ठरली

प्राध्यापकांसाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी पात्रता परीक्षा (नेट) रविवारी झाली. कडक नियम आणि सीबीएसईनेच वाटलेली पेन्स यांमुळे ही परीक्षा उमेदवारांमध्ये चर्चेची ठरली. काही केंद्रांवर परीक्षा खोलीत जर्किन्स नेण्यासही बंदी केल्यामुळे उमेदवारांना वेगळ्याच परीक्षेला सामोरे जावे लागले.
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नेट घेतली जाते. मात्र, ही परीक्षा घेण्याची जबाबदारी गेल्या वर्षीपासून केंद्रीय शिक्षण मंडळाने (सीबीएसई) उचलली आहे. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटण्याबरोबरच परीक्षेच्या कालावधीत होणारे गैरप्रकारही काही राज्यांमध्ये समोर आले होते. परीक्षेतील गैरप्रकारांच्या पाश्र्वभूमीवर मंडळाने या परीक्षेपासून नियमावली अधिक कडक केली. मात्र हे कडक नियम काही केंद्रांवर उमेदावारांसाठी तापदायक ठरले.
या परीक्षेसाठी उमेदवारांना परीक्षा खोलीत घडय़ाळ नेण्यासही बंदी घालण्यात आली होती. मात्र अनेक शाळांमध्ये वर्गात घडय़ाळ नसल्यामुळे उमेदवारांची अडचण झाली. परीक्षेच्या आवारात उमेदवारांना कोणतीही वस्तू नेण्यास बंदी होती. काही परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना स्वेटर, जर्किन्सही काढून ठेवावी लागली. त्यामुळे ऐन थंडीत सकाळी साडेनऊ वाजता उमेदवारांना वेगळ्याच परीक्षेला सामोरे जावे लागले. परीक्षेपूर्वी अडीच तास आधी परीक्षा केंद्रावर हजेरी लावण्याच्या सूचनेमुळेही अनेकांची अडचण झाली. मात्र उशिरा आलेल्या उमेदवारांची अडवणूक केंद्रांवर करण्यात आली नाही.
देशभरात ७ लाख ६५ हजार ३१ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. ८८ शहरांमधील १ हजार ३४४ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. या वेळी ८३ विषयांसाठी नेट झाली.
परीक्षेच्या पेन्सची उमेदवारांमध्ये चर्चा
परीक्षेच्या वर्गात पेन नेण्यासही बंदी घालण्यात आली होती. या वेळी या परीक्षेसाठी मंडळाकडूनच उमेदवारांना पेन देण्यात आले. ‘यूजीसी नेट डिसेंबर २०१५’ असे लिहिलेल्या या पेनानेच उत्तरे लिहिण्यासाठी उमेदवारांना परवानगी देण्यात आली होती. मेक इन इंडिया म्हणताना मंडळाने मात्र जपानी कंपनीच्या वाटलेल्या या पेन्सची उमेदवारांमध्ये चर्चा होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2015 3:36 am

Web Title: strict rules net candidates test
टॅग : Rules
Next Stories
1 ‘बँक डेव्हलपमेंट फंड’ निर्माण करण्याचा विचार – सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सूतोवाच
2 साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ‘उत्सवातील गणपती’ नसतो – डॉ. सदानंद मोरे
3 सहकार खात्याच्या समिती अध्यक्षपदी बाळासाहेब अनास्कर यांची नियुक्ती
Just Now!
X