विसर्जन मार्गावर कडक बंदोबस्त; मिरवणुकीवर सीसीटीव्हींची नजर

वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाची सांगता रविवारी (२३ सप्टेंबर) दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. यंदाची विसर्जन मिरवणूक किती तासांची असेल याची उत्सुकता सामान्यांना देखील आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीसाठी लागणारा वेळ वाढत चालला आहे. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी तसेच शहरात कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्त्यासह संपूर्ण शहरात पावणेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

पुण्यातील विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक येतात. गेल्या काही वर्षांपासून विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने परदेशी पर्यटक हजेरी लावत आहेत. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. संभाव्य घातपाती  कारवायांच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या काही वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीची सांगता होण्यास वेळ लागत आहे. मिरवणुकीसाठी चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. विसर्जनच्या दिवशी शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठय़ा प्रमाणावर बदल केले जातात. मध्यभागातील सर्व पेठांमधील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतात. त्यामुळे सामान्यांची कुंचबणा होते, असा अनुभव आहे.

विसर्जन मिरवणूक वेळेत संपविण्यासाठी पोलीस तसेच मंडळांकडून फारसे प्रयत्न केले जात नाही, असे चित्र आहे.

मिरवणुकीची धुरा कार्यकर्त्यांवर

काही वर्षांपूर्वी विसर्जन मिरवणुकीत धक्कापथके असायची. मात्र, काही वर्षांपासून पोलिसांकडून फारसा हस्तक्षेप केला जात नाही. कार्यकर्त्यांशी वाद घालण्यास पोलीस टाळतात. एकप्रकारे मिरवणूक कार्यकर्त्यांवर सोपवून देण्याचा प्रकार वाढीस लागला आहे.

दृष्टिक्षेपात बंदोबस्त

* शहरात पावणेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त

* विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

* साध्या वेशातील पोलिसांची गस्त

* टिंगळटवाळी तसेच चोऱ्या रोखण्यासाठी खास पथक

* शहरातील प्रमुख १७ रस्ते वाहतुकीसाठी बंद

* विसर्जन मार्गावर पोलिसांचे मनोरे