News Flash

पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी

या संदर्भात एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली.

(संग्रहित छायाचित्र)

काळ्याचे पांढरे करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी शहरात कारवाई सुरू केली आहे. शहरात गेल्या आठवडाभरात काळ्याचे पांढरे करताना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत व्यावसायिकांकडून अडीच कोटी रुपयांची रोकड पकडली आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी संशयित वाहनांची तपासणी सुरू केली आहे.

नोटाबंदीनंतर शहरात त्या अनुषंगाने वेगवेगळ्या अफवा सुरू आहेत. रोकड सापडल्यासंबंधी समाजमाध्यमातून मोठय़ा प्रमाणावर संदेशही येत आहेत. सध्या पुण्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील तपासपथकाच्या अधिकाऱ्यांना काळ्या पैशांची माहिती खबऱ्यांमार्फ त मिळत आहे. संशयित वाहनांची माहितीदेखील पोलिसांना दिली जात आहे. महामार्गावर तसेच उपनगरात असलेल्या पोलीस ठाण्यांना अशा प्रकारची माहिती मोठय़ा प्रमाणावर मिळत आहे.या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी संशयित वाहनांवर लक्ष केंद्रित केले असून अशा वाहनांची तपासणी सुरू केली आहे.

या संदर्भात एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली. ते म्हणाले की सध्या काळ्या पैशांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती नागरिक पोलिसांना देत आहेत.

काळा पैसा पकडल्यानंतर कारवाईचे अधिकार पोलिसांना नाहीत. पोलीस ठाण्यात पकडलेली रोकड ठेवली जाते. त्यासंबंधीची माहिती आयकर विभागाला दिल्यानंतर त्यांच्यामार्फत चौकशी केली जाते. अशा प्रकारच्या घटनांमध्ये ज्याच्याकडून काळा पैसा जप्त करण्यात आला आहे, त्याला अटकदेखील केली जात नाही.

आयकर विभागाकडे रोकड सोपवल्यानंतर पुढील कारवाई केली जाते. महामार्ग तसेच उपनगरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर पोलिसांकडून नाकाबंदी करून संशयित वाहनांची नियमित तपासणी सुरू आहे.

नोटाबंदीनंतर पोलिसांनी खासगी मोटारींवर लक्ष केंद्रित केले आहे. मोटारीच्या डिक्कीतून काळ्या पैशांची वाहतूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलिसांकडून नाकाबंदी केल्यानंतर मोटारचालकांना तपासणी करताना डिक्की उघडण्याची सूचना केली जात आहे. चारचाकी वाहनांबरोबरच शहराच्या मध्य भागात संशयित दुचाकीस्वारांचीही पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे. नाकाबंदी दरम्यान पोलिसांकडून दुचाकीच्याही डिक्की उघडण्याच्या सूचना दिल्या जात असल्याचे पाहायला मिळाले.

रोकड पकडल्याच्या घटना

* २६ नोव्हेंबर- हडपसर भागातील ससाणेनगर येथे दोघा व्यावसायिकांना पकडले, २५ लाखांची रोकड जप्त

* २४ नोव्हेंबर- लष्कर भागात व्यावसायिकाकडून एक कोटी १२ लाखांची रोकड पकडली

* २३ नोव्हेंबर- शिवाजीनगरमध्ये इस्टेट एजंटकडून एक कोटी अकरा लाखांची रोकड जप्त

सोन्यात काळा पैसा गुंतवल्याची चर्चा

शहरातील अनेकांनी सोन्यात काळा पैसा गुंतवल्याची चर्चा जोरात आहे. काही सराफ व्यावसायिकांनी चलनातून बाद केलेल्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारल्या, असेही सांगितले जात आहे. बाद केलेल्या नोटा स्वीकारताना सोन्याची चढय़ा भावाने विक्री केली गेली. प्रतितोळा चाळीस हजार रुपयांनी सोन्याची विक्री केल्याची चर्चा आहे.

‘लोकसत्ता’च्या पाहणीत काय दिसले..

* काळ्याचे पांढरे करणारे एजंट सक्रिय

* नोटा पकडल्याच्या अफवांचा बाजार

* एजंटाची माहिती पोलीस किंवा आयकर विभागाला नाही

* पोलिसांनी अडीच कोटी पकडले, मात्र, एजंट सापडले नाहीत

* परप्रांतीय मजुरांना हाताशी धरून काळ्याचे पांढरे करण्याचा उद्योग

* पोलिसांकडून संशयित वाहनांची तपासणी

* बतावणी करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 3:53 am

Web Title: strike inspection of vehicles by pune police
Next Stories
1 नियमबाहय़ वेतनवाढीची वसुली करण्याची विद्यापीठाकडून केवळ हमी
2 यूपीए व काँग्रेसच्या काळात ‘संघटित दरोडय़ा’ची परिकाष्ठा- पीयूष गोयल
3 ‘संविधान सन्मान मूक मोर्चा’त निळाईचे दर्शन