शाळांचा पहिला दिवस साजरा

सजवल्यामुळे वेगळीच वाटणारी शाळेची इमारत.. सुट्टीनंतर भेटलेले मित्र.. खाऊ वाटणाऱ्या बाई आणि खूप सारा उत्साह या वातावरणाला साथ होती ती नव्या विद्यार्थ्यांच्या रडण्याच्या आणि किंचाळण्याच्या आवाजाची. अशा वातावरणात शहरातील शाळा बुधवारी मोठय़ा सुट्टीनंतर खडबडून जाग्या झाल्या.

शहरातील शाळांचा पहिला दिवस हा उत्साहाने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात गेला. सजावट, खाऊ, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या आवडीची कार्टून्स, फुगे अशी जय्यत तयारी शाळांनी केली होती. मोठय़ा वर्गामधील विद्यार्थ्यांचा उत्साह आणि त्याच वेळी पहिल्यांदाच शाळेत पाऊल टाकलेल्या विद्यार्थ्यांच्या रडण्याचे चढलेले सूर अशा वातावरणाने शाळा भरून गेल्या होत्या. शाळा सुरू होतानाची गंमत आणि स्वागत समारंभ आटोपल्यानंतर मात्र वर्गामध्ये कल्लोळ सुरू झाला. सुरुवातीला शाळांमध्ये दिसणारे छान, आनंदी वातावरण आई आपल्याबरोबर थांबणार नाही हे कळल्यावर बदलून जायला लागले. शाळेच्या खिडक्या, दारांमधून मान काढून आईचा शोध सुरू झाला. रडणाऱ्या मुलांना सावरण्यासाठी आणि पळून जाणाऱ्यांना पकडण्यासाठी शाळांमधल्या शिक्षक आणि मदतनिसांची धावपळ सुरू होती.

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गणेशोत्सव मंडळे, स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घेतला होता. सेवा मित्र मंडळातर्फे गुलाबाचे फूल आणि रेवडी देऊन स्वागत करण्यात आले. कॅम्प भागातील सेंट जॉन सेकंडरी शाळेत विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. साईनाथ मित्र मंडळातर्फे नवीन मराठी शाळेत बोलक्या बाहुल्यांच्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते.

वाहतुकीचा खोळंबा

शहरातील मध्यवर्ती भागांतील शाळांच्या बाहेर शाळा भरण्याच्या वेळेला पालकांची मोठी गर्दी झाली. विद्यार्थ्यांना सोडायला आलेले पालक, विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने यांमुळे शाळांच्या परिसरात सकाळी वाहतुकीचा खोळंबा झाला होता.