‘हम उस देश के वासी हे जिस देश में गंगा बहती है, फिर भी पानी महेंगा क्यू है भाई’ अशा गीतासह प्रभावीपणे सादर केलेल्या पथनाटय़ातून विद्यार्थ्यांनी पाणीबचतीचा संदेश दिला. राज्यातील तीव्र दुष्काळ आणि भेडसावणारी पाणीटंचाई या पाश्र्वभूमीवर पाणीबचतीचे महत्त्व सांगत महाविद्यालयीन युवकांनी नागरिकांचे प्रबोधन केले.

पाण्याचे महत्त्व, पाण्याचा बेसुमार वापर केल्यामुळे होणारे दुष्परिणाम, वाया जाणारे पाणी वाचविण्यासाठीच्या उपाययोजना या विषयांवर विद्यार्थ्यांनी पथनाटय़ातून भाष्य करीत रंजनाच्या माध्यमातून जनजागृती केली. दुष्काळाचे ज्वलंत सादरीकरण करीत विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये या महासंकटाला सामोरे जावे लागू नये यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण, पाण्याचा पुनर्वापर, झाडे लावा झाडे जगवा, घरगुती वापरातील पाण्याची नासाडी कमी करण्यासाठीच्या उपाययोजना याची माहिती आपल्या बहारदार कलाविष्कारातून दिली.

पुणे आणि िपपरी-चिंचवड येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणारे अक्षय घोळवे, सौरभ चंदनशिवे, प्रमोद पंदे, अवधूत कुलकर्णी, अनिकेत ठोंबरे, राजेंद्र डावरे, प्रशांत जगदाळे, वैभव भंडाळकर, सचिन चिकटे, सुशील गरुड, किरण सरोदे, शुभम बोराटे या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जलदूत कलामंचची स्थापना केली. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये नागरिकांनी पाण्याचे महत्त्व ओळखून आणि पाणीबचत करण्यासंबंधीची जाणीव विकसित करावी या उद्देशातून पथनाटय़ातून प्रबोधन करण्याचा निर्धार केला. वेगवेगळी गीते आणि कवितांच्या सादरीकरणातून ‘थेंब थेंब वाचवूया’ असा संदेश देत विद्यार्थ्यांनी आतापर्यंत या पथनाटय़ाचे ७५ प्रयोग केले आहेत. विविध शाळा-महाविद्यालये, रेल्वे स्थानक, बसस्थानक, भाजी मंडई, झोपडपट्टी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संभाजी उद्यान येथे हे प्रयोग करण्यात आले आहेत.  आम्ही सर्व विद्यार्थी काम करून शिकणारे आहोत. तरीही पाण्याविषयीची तळमळ गप्प बसू देत नव्हती. म्हणूनच घराबाहेर पाऊल टाकून समाज प्रबोधन करण्यासाठी पथनाटय़ हा पर्याय स्वीकारला. या पथनाटय़ाचे राज्यभरात प्रयोग करण्याची आमची इच्छा आहे, अशी भावना अक्षय घोळवे याने व्यक्त केली.