निशाद चौगुले या पुण्याच्या विद्यार्थ्यांला त्याच्या ‘बॉर्डर पॅट्रोल’ या लघुचित्रपटासाठी ‘स्टुडंट ऑस्कर’ पारितोषिक मिळाले आहे. निशादने युनायटेड किंग्डममधील ‘नॉर्दर्न फिल्म स्कूल’मधून चित्रपटविषयक पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून त्याने हा लघुचित्रपट बनवला होता. ४१ व्या स्टुडंट अॅकॅडमी अॅवॉर्डस्मध्ये ‘बेस्ट फॉरेन फिल्म’ विभागात ‘बॉर्डर पॅट्रोल’ची निवड झाली आहे.
बॉर्डर पॅट्रोलची निर्मिती निशादने, तर लेखन- दिग्दर्शन पीटर बाऊमन या विद्यार्थ्यांने केले आहे. हॉलिवूडमध्ये ७ जूनला होणाऱ्या पारितोषिक वितरण समारंभात हा लघुचित्रपट सुवर्णपदकासाठी इतर दोन लघुचित्रपटांशी स्पर्धा करेल. म्युनिकमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेलिव्हिजन अँड फिल्म’ या संस्थेचा ‘नोसेबो’ हा लघुचित्रपट, तसेच इस्त्रायलच्या ‘तेल अवीव युनिव्हर्सिटी’चा ‘पॅरिस ऑन द वॉटर’ हा लघुचित्रपट ‘बॉर्डर पॅट्रोल’बरोबर रिंगणात आहे.
निशाद म्हणाला, ‘‘लघुचित्रपट ऑस्कर स्पर्धेत बाजी मारेल असे वाटलेच नव्हते. हे यश आमच्या सगळ्या टीमच्या कष्टांचे आणि विशेषत: माझा मित्र दिग्दर्शक पीटर बाऊमन याचे आहे. आता ऑस्कर पारितोषिक सोहळ्यात दिग्गज चित्रपटकर्त्यांना भेटायची स्वप्ने पाहतो आहोत.’’
पोलंड, जर्मनी, रोमानिया, फ्रान्स, चीन, जपान, उरूग्वे, अमेरिका आणि इटली या ठिकाणच्या चित्रपट महोत्सवांमध्ये ‘बॉर्डर पॅट्रोल’ दाखवला गेला आहे. गेल्या आठवडय़ात लंडनच्या ‘रॉयल टेलिव्हिजन सोसायटी अॅवॉर्डस्’मध्येही हा लघुचित्रपट अव्वल ठरला होता. तसेच, गेल्या वर्षी बीजिंग फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘आऊटस्टँडिंग इंटरनॅशनल फिल्म’चे पारितोषिकही त्याने पटकावले होते. जूनमध्ये टोकियोत होणाऱ्या ‘शॉर्ट शॉर्टस् इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्येही हा लघुचित्रपट इतर लघुचित्रपटांबरोबर जागतिक स्पर्धेत उतरेल.
 
काय आहे ‘बॉर्डर पॅट्रोल’?
जर्मनीच्या सीमा सुरक्षा दलाच्या दोन सैनिकांना ऑस्ट्रियाच्या सीमेवर एक मृतदेह सापडतो. पण त्या दोघांचे लक्ष आहे जर्मनी आणि ऑस्ट्रिया यांच्यात होणाऱ्या अटीतटीच्या फुटबॉल सामन्याकडे. आयत्या वेळी आलेल्या नसत्या कामामुळे सामना चुकू नये या उद्देशाने ते दोघे तो मृतदेह ऑस्ट्रियाच्या हद्दीत ढकलून देण्याचा विचार करतात. ही गोष्ट ‘ब्लॅक कॉमेडी’ प्रकारात समोर येते. १५ मिनिटांच्या या लघुचित्रपटाचे चित्रीकरण जर्मनीतच करण्यात आले आहे. चित्रपटाची भाषाही जर्मन आहे.