प्रशासनाबरोबरच शाळांचाही हलगर्जीपणा

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक अधिकाधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने अपघातांबाबत सखोल अभ्यास करून राज्य शासनाने विद्यार्थी वाहतुकीबाबत स्कूल बस नियमावली लागू करून चार वर्षांहून अधिक काळ लोटला तरी अद्यापही या नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट होत आहे. नियमावलीकडे दुर्लक्षामुळे २४ जूनला अवनी धर्मेद्र कुमार (वय ५) या चिमुरडीला जीव गमवावा लागला. स्कूल बसच्या दरवाजातून पडून तिचा मृत्यू झाला. नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी न होण्यास प्रशासनाबरोबरच शाळांचाही हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात शालेय विद्यार्थी वाहतुकीतील वाहनांना झालेल्या अपघातांच्या कारणांचा शोध घेऊन या वाहतुकीबाबत स्वतंत्र धोरण राज्य शासनाने आखले आणि त्यानुसार नेमलेल्या समितीने केलेल्या शिफारशींनुसार स्कूल बससाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात आली. नियमावलीमध्ये शाळेचे प्रशासन, बसचा ठेकेदार व प्रशासनाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे बसबाबतचे कडक नियम करण्यात आले आहेत. शालेय बसला पिवळा रंग व चालकाकडे पाच वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभव, तसेच बिल्ला आवश्यक आहे. बसमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, रक्तगट, विद्यार्थ्यांचे थांबे आदींची माहिती असेल. शालेय वाहनासोबत शालेय प्रशासन व कंत्राटदार यांनी विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी सहायकाची नेमणूक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे ही बस १५ वर्षांपेक्षा जुनी नसावी, असा नियम घालण्यात आला आहे.

नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा व शहर स्तरावरील मुख्य समितीबरोबरच शालेय स्तरावर प्रत्येकी एक समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. या समितीलाच बसचे भाडे व थांबे ठरविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत बहुतांश शाळेमध्ये अशा कोणत्याही समित्या असल्या, तरी त्या केवळ कागदावरच आहेत. अनेक शाळा विद्यार्थ्यांच्या शाळेपर्यंतच्या प्रवासाची जबाबदारी घ्यायला अद्यापही तयार नाहीत. त्याबाबत कोणतीही कारवाई होत नाही. नियमावलीनुसार बस आहे की नाही, हे तपासण्यासाठी आरटीओ व वाहतूक पोलिसांकडून कारवाई होते, पण त्यात सातत्य नसल्याने बेकायदेशीर अनेक स्कूल बस रस्त्यावर येत आहेत.ह्ण बसमधील सहायक गायब!

स्कूल बस नियमावलीमध्ये बसमध्ये विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी व त्यांना बसमध्ये चढण्यासाठी व उतरण्यासाठी मदत करण्यासाठी सहायक असणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्वत:ची वाहतूक व्यवस्था असणाऱ्या शाळांच्या बसमध्ये असे सहायक दिसून येतात. मात्र, खासगी ठेकेदाराच्या स्कूल बसमधून सहायक गायब झाले आहेत. अवनी कुमार शाळेत जात असलेल्या बसमध्येही हा सहायक नव्हता. ती बसमधून खाली उतरत असताना दारात दप्तर अडकून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला. बसमध्ये सहायक असल्यास असे अपघात टाळता येऊ शकतात.