पुणे : नव्या शैक्षणिक वर्षांतही विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद राहणार असल्याने १५ जूनपासून शाळा ऑनलाइन पद्धतीनेच भरणार आहेत. मात्र ऑनलाइन शिक्षणासाठी लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी विद्यार्थी आणि पालकांची लगबग सुरू झाली असून, शैक्षणिक साहित्याने दुकानेही सजली आहेत.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी अवघे काहीच दिवस विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन प्रत्यक्ष वर्गात शिक्षण घेता आले. वर्षभर ऑनलाइन पद्धतीने घरी राहून विद्यार्थ्यांना शाळा आणि अभ्यास करावा लागला. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आता आटोक्यात आला असला, तरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत शालेय शिक्षण विभागाने १५ जूनपासून ऑनलाइन पद्धतीनेच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑनलाइन शाळा सुरू होण्यास काहीच दिवस बाकी असल्याने शालेय साहित्याच्या दुकांनामध्ये साहित्याच्या खरेदीसाठी विद्यार्थी-पालक येत आहेत. अप्पा बळवंत चौकासह विविध भागांतील शालेय साहित्याच्या दुकानांमधून पालक आणि विद्यार्थ्यांकडून  वह्य़ा, पुस्तके , कंपासपेटय़ा, रंग, चित्रकलेच्या वह्य़ा आदी साहित्याची खरेदी करण्यात येत आहे.

दप्तरे, रेनकोट, छत्र्यांना विशेष मागणी नाही

करोनापूर्वी दप्तरांची खरेदी मोठय़ा प्रमाणात व्हायची. मात्र यंदा शाळा ऑनलाइनच सुरू होणार असल्याने दप्तरांना विशेष मागणी नाही. के वळ शालेय साहित्याच्या खरेदीचेच प्रमाण अधिक आहे. तसेच प्रत्यक्ष शाळेत जायचे नसल्याने विद्यार्थ्यांसाठीचे रेनकोट, छत्री यांचीही विशेष विक्री होत नसल्याचे विक्रे त्यांनी सांगितले.