यूजीसी व एआयसीटीईचा मान्यतेनुसार ‘एमबीए’ चा अभ्यासक्रम चालविण्यात येत असल्याचे सांगून व नोकरीचे आमिष दाखवून प्रभात रस्त्यावरील डब्ल्यूएलसी इंडिया महाविद्यालयाने लाखो रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दोन विद्यार्थिनींनी केली आहे. याबाबत कारवाईची मागणी करीत महापेरेंट संघटना व विद्यार्थ्यांच्या पालकांनी डेक्कन पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता.
रेचल आढाव (रा. रास्ता पेठ) व रेणू वर्मा (रा. बोईसर, ठाणे) या दोन विद्यार्थिनींनी डेक्कन पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली आहे. या दोन्ही विद्यार्थिनींनी डब्ल्यूएलसी इंडियाच्या संकेतस्थळावरून अभ्यासक्रमाविषयी माहिती घेतली. या महाविद्यालयात एमबीएचा अभ्यासक्रम शिकवला जात असल्याचे सांगून तसेच नोकरीची शंभर टक्के हमी देत त्यांना प्रवेश देण्यात आला. रेचल हिने १ लाख ६८ हजार ५०० रुपये, तर रेणू हिने २ लाख २५ हजार रुपये शुल्क भरले. महाविद्यालयातील वर्ग सुरू झाल्यानंतर तेथे एमबीएचा अभ्यासक्रम शिकविला जात नसल्याचे या विद्यार्थिनींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शुल्क परत मागितले. मात्र शुल्क परत देण्यास महाविद्यालयाने नकार दिल्याची तक्रार या विद्यार्थिनींनी केली आहे.
महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर कर्नल संजीव नाग यांनी विद्यार्थिनींनी केलेले आरोप फेटाळून लावले. महाविद्यालयाला यूजीसी व एआयसीटीईची मान्यता नसल्याचे तसेच येथे एमबीएचा अभ्यासक्रम नसल्याची पूर्ण कल्पना त्यांना देण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला. महाविद्यालयाची कागदपत्रे पोलिसांकडे देण्यात आली आहेत. पोलीस घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असेही ते म्हणाले.