05 July 2020

News Flash

निगडी येथे अपघातात तीन महाविद्यालयीन विद्यार्थी ठार

रात्रीच्या वेळी अभ्यास करत असताना चहा पिण्यासाठी दोन दुचाकीवर गेलेल्या पाच विद्यार्थ्यांना भरधाव मोटारीने धडक दिली, त्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

| July 23, 2015 03:20 am

रात्रीच्या वेळी अभ्यास करत असताना चहा पिण्यासाठी दोन दुचाकीवर गेलेल्या पाच विद्यार्थ्यांना भरधाव मोटारीने धडक दिली, त्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघे जबर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास घडली. निगडीतील ‘आयआयसीएमआर’ महाविद्यालयातील ‘एमसीए’च्या तृतीय वर्षांतील हे विद्यार्थी होते. सहा महिन्यांनंतर ते शिक्षण संपवून नोकरीला लागणार होते. मात्र, पुढील आयुष्याची सुरुवात होण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
किरण दिलीपराव दहाणे (वय २४, रा. सातारा), संकेत कमलाकर समेल (वय २३, रा. खोपोली) आणि शुभम संभाजी भालेकर (वय २३, रा. पारनेर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर, अविनाश बबन माने आणि शिनो जॉन विद्यायाती (दोघेही रा. भेळ चौक, निगडी) हे जखमी आहेत. या प्रकरणी मोटारीचा चालक मयूर रमेश घुमटकर (वय २९, रा. शाहूनगर, चिंचवड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचही जण निगडीतील आयआयसीएमआरचे विद्यार्थी असून वाल्हेकरवाडीत एकाच खोलीत राहतात. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ते अभ्यास करत बसले होते. मध्यरात्रीनंतर थकवा घालण्यासाठी चहा पिण्याचा बेत करून निगडी जकात नाक्यावर आले. तेथून खोलीवर परतत असताना ‘हॉटेल पूना गेट’समोर इंडिगो मान्झा मोटारीने त्यांना समोरासमोर धडक दिली. त्यात अॅक्टिव्हावर असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या दुचाकीवर असलेले अविनाश व शिनो जखमी झाले, त्यांच्यावर देहूरोडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भात, देहूरोड स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांनी सांगितले, की मोटारीने लेनचा नियम पाळला नाही. त्यामुळे समोरासमोर धडक होऊन दुचाकीवर असलेले तिघे जण ठार झाले. मोटार चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. देहूरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.
..ती शेवटची विचारपूस!
रात्री बाराच्या सुमारास संकेतचे वडिलांशी बोलणे झाले होते, त्यांनी त्याची नेहमीप्रमाणे विचारपूस केली. तृतीय वर्षांत असल्याने सहा महिन्यांनंतर तो नोकरीला लागणार होता, तसे त्याने वडिलांनाही सांगितल होते. अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर वडिलांना जबर धक्का बसला. या घटनेने महाविद्यालयातील वातावरण शोकाकुल झाले होते.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2015 3:20 am

Web Title: students iicmr mca accident
टॅग Mca
Next Stories
1 अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू होणार
2 विद्यार्थी वाहतुकीतील रिक्षा बदलणार?
3 पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना रेनकोट देण्यासाठी नव्याने प्रस्ताव
Just Now!
X