आयुष्यात एकदा तरी एव्हरेस्ट सर करायचा हे जसे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते, तसे रंगमंचावर कला सादर करणाऱ्या प्रत्येक कलावंताचे लंडन येथील रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये एकदा तरी आपली कला सादर करण्याची संधी मिळावी हे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी पुण्यातील बालचमू सज्ज झाले असून त्यांची लंडनवारी सुरू झाली आहे.
व्हिक्टोरिया राणीने १८७१ मध्ये रॉयल अल्बर्ट हॉलचे उद्घाटन केले होते. तेव्हापासून जगातील नामांकित कलाकारांनी येथे आपली कला सादर करण्याची मनीषा बाळगली होती. आणि नंतर हजेरी लावून ही महत्त्वाकांक्षा पूर्ण केली होती. ब्रिटिश सुझुकी असोसिएशन या संस्थेने ‘गाला कॉन्सर्ट’ आयोजित केली असून त्यामध्ये पुण्यातील सुझुकी स्कूल ऑफ व्हायोलिन या संस्थेतील १५ मुलांची निवड झाली आहे. जगभरातील २८ देशांतील आणि वेगवेगळ्या २२ भाषा बोलणारी १२०० मुले एकत्रितपणे हा संगीत जलसा रंगविणार आहेत. त्यामध्ये भारताचा समावेश ही अभिमानाची गोष्ट आहे. भारताचा संघ रमा चोभे या शिक्षिकेसमवेत लंडनला रवाना झाला आहे.
लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ म्युझिक येथे हा चमू शनिवारी (२६ मार्च) एक कार्यक्रम करेल. त्यानंतर रविवारी (२७ मार्च) रॉयल अल्बर्ट हॉल येथे जगभरातून येणाऱ्या १२०० उभरत्या कलाकारांच्या वाद्यवृंदात सहभागी होऊन सादर होणाऱ्या कार्यक्रमाचा एक भाग होण्याची सुवर्णसंधी या मुलांना मिळणार आहे. या दोन दिवसांच्या सादरीकरणानंतर ही मुले २९ ते ३१ मार्च असे तीन दिवस इम्पिरिअल कॉलेज येथे होणाऱ्या संगीत शाळेत सहभाग घेतील, अशी माहिती रमा चोभे यांनी दिली.
सुझुकी स्कूल ऑफ व्हायोलिन या संस्थेला १६ वर्षांची परंपरा असून येथे शंभरहून अधिक मुले डॉ. शिनिची सुझुकी यांनी विकसित केलेल्या सुझुकी पद्धतीने व्हायोलिनवादनाचे शिक्षण घेत आहेत. या मुलांनी यापूर्वी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झालेल्या जागतिक सुझुकी संमेलनात सहभाग घेतला होता. हिंदूुस्थानी शास्त्रीय व्हायोलिनवादक असलेल्या रमा चोभे यांनी सुझुकी पद्धतीचेही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आहे.